वाशिंग्टन - कधी काळी गल्ली क्रिकेटपासुन सुरू झालेला प्रवास थेट अमेरिकेच्या वॉशिंग्टन येथील मैदानावर मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पाहायला मिळाला. निमित्त होते, उत्तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट् मंडळाच्या महिला क्रिकेट स्पर्धेचं. बीएमएम प्रेसिडेंट संदीप दीक्षित यांच्या पुढाकारातून अमेरिकेत नेशनवाईड क्रिकेट टुर्नामेंट समर २०२३ यंदापासून सुरू करण्यात आली. बाहेरील देशातून अमेरिकेत आलेल्यांना एकत्र करण्याचं काम या टुर्नामेंटच्या माध्यमातून झालंय. या स्पर्धेत यंदा स्त्रीदेवी कट्टा डीएमव्ही चार्जर्स आणि एमकेएम सुपर क्वीन संघात सामना झाला. त्यात, स्त्रीदेवी कट्टाने एकतर्फी विजय मिळवत चषक उंचावला. तर, डीएमव्हीच्या मौनिका यांनी वुमेन ऑफ द मॅचचा खिताब जिंकला
बालती मोरे महाराष्ट्र मंडळाच्यावतीने स्त्रीदेवी कट्टा डीएमव्ही चार्जर्सचा संघ मैदानात उतरला होता. तर, एमकेएम सुपर क्वीन संघही विजयाचं ध्येय बाळगत सज्ज होता. महिलांच्या या क्रिकेट संघातील विविधता फक्त भाषेची नव्हती. तर वय आणि नात्यात सुद्धा होती. अगदी आईपासून ते सासूपर्यंतच्या साऱ्याजणी मैदानात उतरल्या होत्या. ''खेळाचा आनंद लुटणे आणि उत्तम बाजी खेळणे'' हाच उद्देश ठेऊन दोन्ही संघ मैदानात होते. सगळ्यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता.
एमकेएम सुपर क्वीन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सुपर क्वीनला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. डीएमव्ही चार्जर्सच्या कर्णधार मौनिका यांच्या उत्तम गोलंदाजीने कमाल केली. संघाच्या उत्तम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर चार्जर्सने एमकेएम सुपर क्वीनला १० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात केवळ ४९ धावांवर रोखले. त्यामुळे, १० षटकांत ५० धावांचे हे लक्ष्य घेऊन डीएमव्ही चार्जर्सचा संघ मैदानात उतरला होता. मात्र, अवघ्या ५.४ ओवर्समधे ९ गडी राखून स्त्रीदेवी कट्टा डीएमव्ही चार्जर्सने सहजच विजय मिळवला अन् संघाने विजयी चषकही पटकावला. चार्जर्सच्या मौनिका (२५) आणि प्रिया (१९) यांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या ४० धावांच्या भागिदारीमुळे संघाचा विजय सोपा झाला. मौनिकाने २५ धावा आणि ४ गडी बाद करुन 'वुमेन ऑफ द मॅच'चा पुरस्कार पटकावला.
एका व्हॉट्सअप मेसेजने सुरू झाला प्रवास
स्त्रीदेवीकट्टा महिला ग्रुपच्या संस्थापिका प्रिया जोशी या वॉशिंग्टन डीसी भागातीतल उत्साही आणि नामांकीत व्यक्तिमत्व. त्यांच्या व्हॉट्सअप मेसेजने महिलांसाठी अमेरिकेत क्रिकेट स्पर्धा सुरू होण्याचा श्रीगणेशा झाल्याचे प्राची हेंद्रे यांनी सांगितले. महिलांचा क्रिकेट संघ ही कल्पना नविन नाही, पण वास्तवात आणणेही तितके सोपे नव्हते, तेही आपलं गाव सोडून साता समुद्रापार आलेल्या देशात. मात्र, क्रिकेटची आवड असणाऱ्यां मैत्रिणींनी प्रतिसाद दिला आणि आमचा संघ स्त्रीदेवी कट्टा डीएमव्ही चार्जर्स बनायला सुरूवात झाली. नुसते खेळाडूच नाही, तर दोन अनुभवी प्रशिक्षकही या संघाला मिळाले. मैत्री मेळावा या सत्राखाली माधवी आगाशे यांच्या नेतृत्त्वात आणि मराठी कला मंडळाने ह्या स्पर्धेचे आयोजन केले होते. मराठी कला मंडळाच्या क्रीडा विभागाचे ऋषिकेश चव्हाण यांनी टुर्नामेंटसाठी उत्कृष्ट संयोजन केल्याची माहितीही प्राची हेंद्रे यांनी दिली.
बालपणीच्या आठवणींना उजाळा
दरम्यान, एका वॅाट्सअॅपच्या मेसेजने सुरू झालेली ही महिला क्रिकेटची वाटचाल सर्वांना बालपणीच्या जुन्या आठवणीत घेऊन गेली. अमेरिकेत राहुन वुमन्स क्रिकेटचा वारसा चालू ठेवण्याचा प्रयत्न डीएमव्ही चार्जर्स आणि एमकेएम क्वीन्स संघाने यशस्वी करुन दाखवल्याचा आनंद सर्वच महिला खेळाडू आणि स्पर्धेसाठी मेहनत घेणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकला होता.
विजयी संघ
टीम डीएमव्ही चार्जर्स - मौनिका (कर्णधार), प्रिया, विणा, प्राची, फ्रेनी, अरुंधती, मनिषा, पुर्वी, सारा, सानिया, असावरीप्रशिक्षक - धवल, मंगेश
Script: प्राची हेंद्रेEdited by: प्रिया जोशी