नवी दिल्ली : लिजेल लीसह चार फलंदाजांच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाने पूनम राऊतची नाबाद शतकी खेळी व्यर्थ ठरविताना, चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात रविवारी भारताचा सात विकेट्सने पराभव केला. या शानदार विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. (Women's cricket: South Africa's winning lead; Poonam Raut's century in vain, India lost by 7 wickets)
२६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना द. आफ्रिकाने लिजेल (६९), मिगनोन ड्यू प्रीज (६१), लारा गुडॉल (नाबाद ५९) व कर्णधार लॉरा वोलवार्ट (५३) यांच्या जोरावर ८ चेंडू व ३ गडी राखून २६९ धावा करीत सहज विजय मिळविला. लिजेलने लॉरासह ११६ धावांची सलामी दिली, तर ड्यू प्रीज व गुडॉलने तिसऱ्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केली.
भारताने अनुभवी पूनम राऊतचे तिसरे शतक व हरमनप्रीत कौरचे आक्रमक अर्धशतक या जोरावर ४ बाद २६६ धावा केल्या. गेल्या दोन सामन्यांत अर्धशतकी खेळी करणाऱ्या पूनमने १२३ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद १०४ धावा केल्या. हरमनप्रीतने ३५ चेंडूंमध्ये ७ चौकार व एका षटकारासह ५४ धावा फटकावल्या. कर्णधार मिताली राजने ७१ चेंडूंमध्ये ४५ धावा केल्या. पूनमने मितालीसोबत तिसऱ्या विकेटसाठी १०३, तर हरमनप्रीतसोबत चौथ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली.
धावफलक भारत महिला : प्रिया पुनिया झे. अयाबोंगा गो. शंगासे ३२, स्मृती मानधना झे. ली गो. शबनिम १०, पूनम राऊत नाबाद १०४, मिताली राज झे. शबनिम गो. शेखुखुने ४५, हरमनप्रीत त्रि. गो. शेखुखुने ५४, दीप्ती नाबाद ८. अवांतर (१३). एकूण ५० षटकांत ४ बाद २६६. गोलंदाजी : शबनिम ५०-१, मारिजेन ५८-०, अयाबोंगा २६-०, शेखुखुने ६३-२, शंगासे ४१-१.
द. आफ्रिका : लिजेल ली पायचीत गो. हरमनप्रीत ६९, लॉरा वोलवॉर्ट झे. वर्मा गो. मानसी ५३, लारा गुडॉल नाबाद ५९, मिगनोन ड्यू प्रीज झे. हरमनप्रीत गो. गायकवाड ६१, मारिजेन केप नाबाद २२. अवांतर (५). एकूण ४८.४ षटकांत ३ बाद २६९. गोलंदाजी : मानसी जोशी ४३-१, गायकवाड ३९-१, राधा ६८-०, दीप्ती ४३-०, पूनम यादव ३६-०, हरमनप्रीत ३८-१.
मितालीचा आणखी एक विश्वविक्रमस्टार मिताली राज महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७ हजार धावा पूर्ण करणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. मितालीने वैयक्तिक २३१व्या सामन्यात ७ हजार धावांचा पल्ला गाठला. बीसीसीआयने मितालीचे कौतुक करताना ट्विट केले की,‘मॅग्निफिसेंट मिताली. टीम इंडिया एकदिवसीय संघाची कर्णधार ७,००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारी पहिली महिला क्रिकेटपटू. शानदार कामगिरी.’
१९९९ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारी मिताली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६ हजार धावा पूर्ण करणारी पहिली महिला क्रिकेटपटू आहे. २०१६ मध्ये निवृत्ती झालेली इंग्लंडची चार्लोट एडवर्ड्स ५,९९२ एकदिवसीय धावांसह महिला खेळाडूंमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.