दुबई : न्यूझीलंडमध्ये आयोजित महिला वन डे विश्वचषकादरम्यान कोरोनाचा प्रकोप वाढला तरी विनाअडथळा आयोजन पार पाडण्याच्या हेतूने सर्वच सामने नऊ खेळाडूंसह खेळविले जातील, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गुरुवारी जाहीर केले. वेस्ट इंडिजमध्ये नुकत्याच झालेल्या आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषकापासून आयसीसीने नऊ खेळाडूंसह खेळण्याचा निर्णय समाविष्ट केला आहे. ४ मार्चपासून महिला विश्वषचक सुरू होत असून, सलामीचा सामना यजमान न्यूझीलंडविरुद्ध वेस्ट इंडिज असा खेळला जाईल.
१९ वर्षांखालील विश्वचषका दरम्यान मात्र ही गरज भासली नाही. भारताने विक्रमी पाचव्यांदा विश्वचषक जिंकला. आयसीसीचे स्पर्धा प्रमुख ख्रिस टेटली म्हणाले, ‘खेळाचे सध्याचे नियम (प्लेइंग कंडिशन्स) कोरोनामुळे कमी खेळाडूंचा संघ मैदानावर उतरविण्याची परवानगी बहाल करतात. यामुळे व्यवस्थापन तसेच कोचिंग स्टाफमधील सदस्य हे बदली क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत मैदानात येऊ शकतात.’
ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार टेटेली यांचे मत असे की, गरज भासल्यास आम्ही व्यवस्थितीत संघांना नऊ खेळाडूंसह खेळण्याची परवानगी बहाल करू. संघांच्या व्यवस्थापनात महिला सदस्य असतील तर बदली क्षेत्ररक्षक म्हणून ते मैदानात येऊ शकतील. मात्र असे क्षेत्ररक्षक गोलंदाजी किंवा फलंदाजी करू शकणार नाहीत.