नवी दिल्ली : पाच संघांचा समावेश असलेल्या महिला आयपीएलला (डब्ल्यूआयपीएल) पुढच्या मार्चमध्ये पुरुष आयपीएलआधी सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने गुरुवारी ही माहिती दिली.वृत्तानुसार डब्ल्यूआयपीएलमध्ये एकूण २० सामने होतील. प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध दोन सामने खेळेल. गुणतालिकेत अव्वल स्थान पटकविणारा संघ फायनल खेळेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहणारे संघ एलिमिनेटर खेळतील.
प्रत्येक संघ आपल्या अंतिम एकादशमध्ये पाच विदेशी खेळाडू खेळवू शकेल. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये संतुलन साधण्यासाठी आणि स्पर्धा वाढविण्यासाठी सध्या पाच संघ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक संघात १८ खेळाडूंचा समावेश असून कोणत्याही संघाला सहापेक्षा अधिक विदेशी खेळाडू घेता येणार नाहीत. अंतिम एकादशमधील पाचपैकी चार खेळाडू पूर्णकालीन सदस्य देशांचे तर एक खेळाडू सहयोगी सदस्य देशातील असेल. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश आणि इंग्लंडमधील द हंड्रेड महिला लीगमध्ये तीनपेक्षा अधिक विदेशी खेळाडू खेळविता येत नाही.
संघांची संख्या कमी असल्याने भारतात ‘होम ॲन्ड अवे पद्धतीने सामने खेळविणे शक्य होणार नाही. डब्ल्यूआयपीएलचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत ९ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकानंतर लगेचच केले जाईल.
डब्ल्यूआयपीएलमध्ये ‘होम ॲन्ड अवे’ पद्धतीने सामने खेळविणे आव्हानात्मक असेल. त्यादृष्टीने आधीचे दहा सामने एका स्थळी तर नंतरचे दहा सामने दुसऱ्या स्थळी आयोजित करण्याची सूचना आली. सहभागी संघांची विक्री क्षेत्रीय पद्धतीने होईल. प्रत्येक्ष क्षेत्रातून दोन शहरांची निवड करण्यात येत आहे. त्यात धर्मशाळा/ जम्मू (उत्तर क्षेत्र), पुणे/राजकोट (पश्चिम), इंदूर /नागपूर/रायपूर (मध्य), रांची/कटक (पूर्व), कोच्ची/विशाखापट्टनम (दक्षिण) आणि गुवाहाटी (ईशान्य) या शहरांचा समावेश आहे.