Join us  

महिला एकदिवसीय क्रिकेट: द. आफ्रिकेचा मालिका विजय, पाचव्या सामन्यात भारताचा पाच विकेट्सने पराभव

कर्णधार मिताली राजच्या नाबाद ७९ धावांच्या खेळीनंतरही भारताला १८८ पर्यंतच मजल गाठता आली. प्रत्युत्तरात एनेके बॉश(५८)आणि मिगनोन डू प्रीज(५७) यांच्या अर्धशतकांच्या बळावर द. आफ्रिकेने ४८.२ षटकात ५ बाद १८९ धावा करीत सामना जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 3:32 AM

Open in App

लखनौ : दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात बुधवारी भारतीय महिला संघाचा पाच विकेट्सने पराभव करीत पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली. (Women's ODI cricket: The Africa won the series, India lost the fifth match by five wickets)

कर्णधार मिताली राजच्या नाबाद ७९ धावांच्या खेळीनंतरही भारताला १८८ पर्यंतच मजल गाठता आली. प्रत्युत्तरात एनेके बॉश(५८)आणि मिगनोन डू प्रीज(५७) यांच्या अर्धशतकांच्या बळावर द. आफ्रिकेने ४८.२ षटकात ५ बाद १८९ धावा करीत सामना जिंकला. या मालिकेद्वारे भारतीय संघाला वर्षभरानंतर आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली होती. मालिकेच्या सुरुवातीला खेळाडू फॉर्ममध्ये नव्हते, मात्र पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार बनण्यासाठी भारताला मोठी मेहनत घ्यावी लागेल, हे या मालिकेनंतर स्पष्ट झाले आहे.

फिरकीविरुद्ध यशस्वी फलंदाजी ही भारताच्या जमेची बाब असली तरी द. आफ्रिकेच्या फिरकी माऱ्यापुढे आक्रमक फलंदाजी होऊ शकली नाही. याशिवाय भारताची गोलंदाजीही चिंतेचा विषय आहे. 

भारताने १३ षटकात ५३ धावात तीन फलंदाज गमावले होते. मितालीने हरमनप्रीत कौरसोबत चौथ्या गड्यासाठी ७१ धावांची भागीदारी केली. हरमन ३० धावा करीत ३१ व्या षटकात स्नायू ताणले गेल्यामुळे निवृत्त होऊन परतली. मितालीने १०४ चेंडूत आठ चौकार आणि एक षटकार ठोकला.

    टीम इंडियाची घसरगुंडी-  सलामीवीर  प्रिया पुनिया (१८), पुनम राऊत  (१०) आणि स्मृती मानधना (१८) लवकर माघारी फिरल्या. डायलन हेमलता (२) आणि  सुषमा वर्मा (००) या अपयशी ठरल्या. -  अनुभवी मितालीने ३८ व्या षटकात कारकिर्दीतील ३८ वे आणि मालिकेतील दुसरे अर्धशतक गाठले. -  झूलन गोस्वामी (५) आणि मोनिका पटेल (९) याही स्थिरावू शकल्या नाहीत.  -  पदार्पण करणारी सी. प्रत्युषा दोन धावा काढून बाद होताच ४७ व्या षटकात ८ बाद १७६ अशी धावसंख्या होती. -  मितालीने एक टोक सांभाळूनदेखील संपूर्ण संघ ४९.३ षटकात बाद झाला.  

    निर्णायक भागीदारी-  द. आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. कर्णधार सुने लुस (१०) हिच्यासह तीन फलंदाज २७ धावात बाद झाले होते. -  डू प्रीज आणि बॉश यांनी मात्र चौथ्या विकेटसाठी साठी ९६ धावा करीत धावसंख्येला आकार दिला. नंतर दोघेही बाद होताच ५ बाद १३१ अशी स्थिती होती. -  विजयासाठी १३ षटकात ५८ धावांची गरज होती. मारिजेन केप (३६*) व नेदिन डी क्लार्क (१९*) यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. - या दोघींनी सहाव्या विकेटसाठी नाबाद ५८ धावा केल्या. बॉशने ७० चेंडूत आठ चौकार आणि प्रीजने १०० चेंडूत चार चौकार मारले. - भारताकडून राजेश्वरी गायकवाडने दहा षटकात १३ धावात तीन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक भारत : ४९.३ षटकात सर्वबाद १८८ धावा(प्रिया पुनिया १८, स्मृती मानधना १८, पुनम राऊत १०, हरमन कौर ३०, मिताली राज नाबाद ७९; केप १/२५, डी क्लार्क ३/३५, शंगासे २/४३,शेखुखुने २/२६.)द. आफ्रिका : ४८.२ षटकात ५ बाद १८९ धावा (मिगनोन डू प्रीज ५७, एनेके बॉश ५८, मेरिजेन केप नाबाद ३६, नेदिन डी क्लार्क नाबाद १९; राजेश्वरी गायकवाड ३/१३,  हेमलता १/४४, प्रत्युषा १/६०.)

अपयशी फलंदाजी प्रमुख फलंदाजांच्या अपयशाने भारताचा पराभव झाला. आगामी विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता फलंदाजांवरील जबाबदारी अधिक वाढली आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकामहिला