Women’s Premier League 2023 MIW vs GGW : महिला प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने आपली ताकद दाखवून दिली. गुजरात जायंट्सविरुद्धच्या या सामन्यात २०७ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर मुंबई इंडियन्सने १४३ धावांनी विजय मिळवला. कर्णधार हरमनप्रीत कौरने ( MI captain Harmanpreet Kaur) WPL मध्ये पहिले अर्धशतक झळकावण्याचा मान पटकावला. तिने ३० चेंडूंत १४ चौकारांच्या मदतीने ६५ धावा कुटल्या आणि गुजरातसमोर तगडे लक्ष्य उभे केले. त्यानंतर गोलंदाजांनी कमाल केली.
यास्तिका भाटीया ( १) लगेच माघारी परतल्यानंतर हेली मॅथ्यू व नॅट शिव्हर-ब्रंट या जोडीने डाव सावरला. शिव्हर-ब्रंट २३ धावांवर ( ५ चौकार) माघारी परतली. मॅथ्यूने जोरदार फटकेबाजी करताना ३१ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ४७ धावा चोपल्या. त्यानंतर हरमनप्रीतने मोर्चा सांभाळला आणि २२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. तिला एमेली केरने चांगली साथ दिली होती. हरमनप्रीत ३० चेंडूंत १४ चौकारांच्या मदतीने ६५ धावांची खेळी करून बाद झाली. केर व पूजा वस्त्राकर यांनी अखेरच्या तीन षटकांत चांगली फटकेबाजी करताना मुंबई इंडियन्सला ५ बाद २०७ धावांचा डोंगर उभा करून दिला.
पूजा ८ चेंडूंत १५ धावा करून माघारी परतली. केर २४ चेंडूत ६ चौकार व १ षटकारांसह ४५ धावांवर नाबाद राहिली. गुजरातच्या स्नेह राणाने दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात गुजरात जायंट्सला धक्क्यांमागून धक्के बसले. त्यांच्या ७ खेळाडू २३ धावांवर माघारी परतल्या होत्या. त्यात भर म्हणून कर्णधार बेथ मूनी रिटायर्ड हर्ट म्हणून माघारी परतली. नॅट शिव्हर-ब्रंट, साईका इसाक व एमिले केर यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. इसी वाँगने एक विकेट टीपली. साईकाने तिच्या खात्यात आणखी दोन विकेट्सची भर टाकली. तिने ३.१ षटकांत ११ धावांत ४ विकेट्स घेतल्या. गुजरात जायंट्स १५.१ षटकांत ९ बाद ६४ धावांवर गडगडला. बेथ मूनी रिटायर्ड हर्ट झाल्यामुळे गुजरातला हार मानावी लागली. मुंबईने १४३ धावांनी सामना जिंकला.
Web Title: Women’s Premier League 2023 MIW vs GGW : Mumbai Indians beat Gujarat Giants by 143 runs in the first ever match in WPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.