Women’s Premier League 2023 । मुंबई : महिला प्रीमियर लीग (WPL) आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे. या स्पर्धेसाठी 13 फेब्रुवारी रोजी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे बीसीसीआयने या बहुचर्चित लीगच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 4 ते 26 मार्च 2023 दरम्यान महिला प्रीमियर लीगचा पदार्पणाचा हंगाम मुंबईत पार पडणार आहे. एकूण 22 सामने ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डी.वाय. पाटील स्टेडियमवर उरलेले सामने खेळवले जातील.
4 मार्चपासून रंगणार WPLचा थरार दरम्यान, 13 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एकूण 409 क्रिकेटपटूंसह महिला प्रीमियर लीग खेळाडूंच्या लिलावाची यादी समोर येईल. लिलाव प्रक्रियेला सोमवारी दुपारी 2.30 वाजल्यापासून सुरूवात होईल. महिला प्रीमियर लीग खेळाडूंच्या लिलावासाठी एकूण 1525 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. अंतिम यादीत 409 खेळाडूंची छाटणी करण्यात आली. 409 खेळाडूंपैकी 246 भारतीय आणि 163 विदेशी खेळाडू आहेत, ज्यात सहयोगी राष्ट्रांच्या 8 खेळाडूंचा समावेश आहे. एकूण कॅप्ड खेळाडू 202 आहेत, तर अनकॅप्ड 199 आणि सहयोगी राष्ट्रांच्या 8 खेळाडूंचा समावेश आहे.
भारतीय रकमेनुसार 50 लाख ही सर्वोच्च राखीव किंमत आहे, ज्यामध्ये 24 खेळाडू सर्वोच्च ब्रॅकेटमध्ये निवडले जातील. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा आणि भारताची अंडर-19 ट्वेंटी-20 विश्वचषक विजेती कर्णधार शेफाली वर्मा या भारतीय खेळाडूंचा समावेश सर्वोच्च ब्रॅकेटमध्ये आहे. तर एलिस पेरी, सोफी एक्लेस्टोन, सोफी डेव्हाईन आणि डिआंड्रा डॉटिन यांच्यासारख्या 13 विदेशी खेळाडूंनी स्वत:ची मूळ किंमत 50 लाख ठेवली आहे. खरं तर 40 लाखांच्या मूळ किंमतीसह 30 खेळाडू लिलावाच्या यादीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"