लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या पहिल्या महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) खेळाडूंचा लिलाव सोमवारी मुंबईत पार पडेल. यावेळी पाच संघ आपली बाजू भक्कम करण्यासाठी पूर्ण ताकद लावतील. तसेच, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा की आणखी कोणी खेळाडू सर्वाधिक किंमत मिळवणार यावर मोठ्या चर्चा रंगल्या आहेत.
विदेशी खेळाडूंमध्ये अलीसा हिली, बेथ मूनी, एलिसे पेरी, नॅट स्किवर, मेगन शट आणि डेंड्रा डॉट्टिन यांच्यासाठी मोठी चढाओढ रंगेल. त्यामुळेच मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, आरसीबी, गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स कशा प्रकारे बोली लावतात. याबाबत सर्वांची उत्सुकला लागली आहे. एकूण ४०९ खेळाडूंपैकी ९० खेळाडूंचे भविष्य सोमवारी बदलेल. प्रत्येक संघ खेळाडूंच्या खरेदीसाठी एकूण १२ कोटी रुपये खर्च करणार असून, सहा विदेशी खेळाडूंसह एकूण १८ खेळाडूंचा संघ तयार करण्यावर प्रत्येक फ्रँचायझी भर देईल. लिलाव प्रक्रियेतील ६० पैकी २०-२५ भारतीय क्रिकेटपटू चांगली रक्कम मिळवतील, हे नक्की.
खेळाडूंची पाच गटात विभागणी करण्यात आली असून, प्रत्येक गटात खेळाडूंची १० पासून ५० लाखांपर्यंतची मूळ किंमत ठेवण्यात आली आहे. या लिलावप्रक्रियेत भारतासह, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू जास्त किंमत मिळवतील, असे म्हटले जात आहे. त्याचप्रमाणे, काहींच्या मते स्मृती, शेफाली, हरमनप्रीत आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा हे स्टार खेळाडू १.२५ ते २ कोटींपर्यंतची कमाई करतील. मोठे फटके खेळण्याची क्षमता राखून असलेली रिचा घोष आणि वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर हेदेखील मोठी किंमत मिळवतील. नुकत्याच झालेल्या १९ वर्षा आतील विश्वचषकात भारताने विजय मिळवला आहे. त्या संघातील प्रमुख खेळाडूंवर लक्ष्य असेल. त्यासोबतच अनुभवी स्मृति, हरमनप्रीत कौर, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील काही खेळाडूंवरही सर्वांची नजर असेल.
विश्वविजेत्यांवर नजर
नुकताच १९ वर्षांखालील विश्वविजेतेपद पटकावलेल्या भारतीय संघातून श्वेता सेहरावत, पार्श्वी चोप्रा, मन्नत कश्यप, तितास साधू आणि अर्चना देवी सर्व फ्रँचायझींमध्ये चुरस निर्माण करतील. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक संघ अनुभवी कर्णधार नेमण्यास भर देणार असल्याने स्मृती, हरमन यांच्यासह मेग लॅनिंग, हीथर नाइट, सोफी डीवाइन यांच्यासाठी मोठी चढाओढ रंगेल.
संघांची नावे
दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी), गुजरात जायंट्स, यूपी वॉरियस.
महत्त्वाचे एखाद्या सामन्यात सहयोगी देशाचा खेळाडू खेळणार असेल, तर प्रत्यक्ष मैदानात प्रत्येक संघ ५ विदेशी खेळाडूंचा समावेश अंतिम एकादशमध्ये करू शकतो.