Women's T20 Challenge 2022 : सुपरनोव्हा संघाने उभ्या केलेल्या १५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना व्हेलॉसिटीच्या शेफाली वर्माने ( Shafali Verma) वादळी खेळी केली. तिने या स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतकाची नोंद करताना व्हेलॉसिटीचा मजबूत पाया रचला. पण, हरमनप्रीत कौरने ( Harmanpreet Kaur) अफलातून झेल घेत तिची घोडदौड रोखली.
सोमवारी सायंकाळी सुपरनोव्हा संघाने स्मृती मानधनाच्या ट्रेलब्लेझर संघाचा ४९ धावांनी पराभव करून महिला ट्वेंटी-२० लीगची दणक्यात सुरुवात केली. आज दुपारच्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हाने व्हेलॉसिटी संघासमोर तगडे आव्हान उभे केले. आघाडीचे तीन फलंदाज अपयशी ठरल्यानंतर तानिया भाटिया ( ३६) व कर्णधार हरमनप्रीतने दमदार खेळ केली. हरमनप्रीतने ५१ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७१ धावा केल्या. सुन ल्यूसने २० धावांचा हारभार लावला. व्हेलॉसिटीच्या केट क्रॉसने दोन विकेट्स घेतल्या. सुपरनोव्हाने ५ बाद १५० धावा केल्या.
प्रत्युत्तरात व्हेलॉसिटीच्या नथ्थाकन चंथम ( १) दुसऱ्याच षटकात बाद झाली. पण, शेफाली वर्माने वादळी खेळी केली आणि तिला यास्तिका भाटीयाने चांगली साथ दिली. डिएंड्रा डॉटिनने ३५ चेंडूंत ६४ धावांची भागीदारी संपुष्टात आणताना भाटीयाला १७ धावांवर त्रिफळाचीत केले. त्याच षटकात शेफाली रन आऊट होता होता वाचली. पुढच्या षटकात तिला LBW दिले, परंतु तिने DRS घेतला अन् त्यामुळे तिला जीवदान मिळाले. शेफालीने ३० चेंडूंत अर्धशतक झळकावले. महिला ट्वेंटी-२० लीगमधील हे सर्वात जलद अर्धशतक ठरले.
पण, तिची ही घोडदौड डॉटीनने रोखली. हरमनप्रीत कौरने भन्नाट झेल घेत शेफालीला माघारी पाठवले. शेफालीने ३३ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ५१ धावा केल्या.
Web Title: Women's T20 Challenge 2022 : Fifty for Shafali Verma - fastest in Women's T20 challenge 2022 - 50* from 30 balls, Stunning catch at short third man by Harmanpreet Kaur, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.