Women's T20 Challenge : महिला ट्वेंटी-२० चॅलेंज लीगच्या सलामीच्या लढतीत हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हा संघाने विजय मिळवला. १६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मानधनाच्या ( Smriti Mandhana ) ट्रेलब्लेझर संघाची अवस्था ७ बाद ७३ अशी झाली आहे. ६३ धावांपर्यंत एकच विकेट गमावणाऱ्या ट्रेलब्लेझर्सने पुढील १० धावांत सहा विकेट्स गमावल्या. पूजा वस्त्राकरच्या उल्लेखनीय गोलंदाजीवर प्रिया पुनियाने ( Priya Punia) दोन अफलातून झेल घेत सामनाच फिरवला. हर्लीन देओलनेही भन्नाट कॅच घेतला. ४ विकेट्स घेणारी पूजा वस्त्राकर या विजयाची शिल्पकार ठरली.
प्रिया पुनिया आणि डिएंड्रा डॉटीन ( Deandra Dottin) यांनी ४.५ षटकांत ५० धावा फलकावर चढवल्या. डॉटीनने १७ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३७ धावा केल्या. हायली मॅथ्यूजने ८व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर प्रिया पुनियाचा ( २२) त्रिफळा उडवला. हर्लीन देओल व कर्णधार हरमनप्रीत कौर यांची ३७ धावांची भागीदारी सलमा खातूनने संपुष्टात आणली. हर्लीन १९ चेंडूंत ५ चौकारांसह ३५ धावा करून LBW झाली. पूजा वस्त्राकर १४ धावा करून माघारी परतली. त्याच षटकात हरमनप्रीत रन आऊट झाली. तिने २९ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. सुपरनोव्हाचे ५ फलंदाज अवघ्या ९ चेंडूंत माघारी परतले. मॅथ्यूने २९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. सुपरनोव्हाने सर्वबाद १६३ धावा केल्या.
कर्णधार स्मृती मानधाना व हायली मॅथ्यूज यांनी प्रत्युत्तरात ३९ धावांची भागीदारी केली. पूजा वस्त्राकारने मात्र ट्रेलब्लेझरच्या तीन खेळाडूंना माघारी पाठवले. मॅथ्यूज १८, स्मृती ३४ ( २३ चेंडू) व सोफी डंक्ली ( १) या तिघींना पूजाने बाद केले. त्यानंतर एलाना किंगने ९व्या षटकात शर्मिन अख्तरेची ( ०) विकेट घेत सुपरनोव्हाचा विजय जवळपास पक्का केला. जेमिमा रॉ़ड्रीग्जवर आता ट्रेलब्लेझरच्या सर्व आशा होत्या. ११व्या षटकात रिचा घोष (२) कट मारण्याच्या प्रयत्नात डॉटीनच्या हाती झेल देऊन माघारी परतली. अरुंधती रेड्डी विचित्र प्रकारे रनआऊट झाली. १ बाद ६३ वरून ट्रेलब्लेझरची अवस्था ७ बाद ७३ अशी झाली.
जेमिमाचा २४ धावांवर हर्लीन देओलने सुरेख झेल टिपला. पूजा वस्त्राकरने ४ षटकांत १२ धावांत ४ विकेट्स घेतल्या. सोफीने १९ धावांत २ विकेट्स घेतल्या. पूनम यादव ( ७) ही किंगच्या ( २-३०) गोलंदाजीवर बाद झाली. ट्रेलब्लेझरना ९ बाद ११४ धावाच करता आल्या आणि सुपरनोव्हाने ४९ धावांनी विजय मिळवला.
Web Title: Women's T20 Challenge 2022 : Supernovas beat Trailblazers by 49 runs in the first match, Watch Harleen Deol's stunning diving catch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.