महिला ट्वेंटी-20 चॅलेंज स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. गतविजेत्या सुपरनोव्हा संघानं जबरदस्त कमबॅक केले. स्मृती मानधानाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ट्रेलब्लॅझर्स संघानं सुरूवात तर दमदार केली, परंतु राधा यादवनं पूर्ण डावच पलटवला. राधानं आजच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली.
हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हा संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ट्रेलब्लॅझर्स संघाला कर्णधार स्मृती मानधना आणि डेंड्रा डॉटिन यांनी दमदार सुरुवात करून दिली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 71 धावांची सलामी करून दिली. पूनम यादवनं डॉटिनला ( 20) माघारी पाठवून ट्रेलब्लॅझर्सला पहिला धक्का दिला. पण, मानधना दुसऱ्या बाजूनं दमदार फटकेबाजी करताना दिसली. तिनं 49 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकार खेचून 68 धावा केल्या. 14.5 षटकात ट्रेलब्लॅझर्सला 101 धावांवर दुसरा धक्का बसला. शशिकला सिरीवर्देनेनं मानधानाला बाद केले.
मानधानाच्या विकेटनंतर सुपरनोव्हानं सामन्यात जबरदस्त कमबॅक केले. राधा यादवनं ( Radha Yadav) ट्रेलब्लॅझर्सच्या गोलंदाजांना झटपट गुंडाळले. 16 धावांत ट्रेलब्लॅझर्सचे 7 फलंदाज माघारी परतले. राधानं 4 षटकांत 16 धावा देताना 5 विकेट्स घेतल्या. महिला ट्वेंटी-20 चॅलेंजमध्ये पाच विकेट्स घेणारी ती पहिलीच गोलंदाज ठरली. ट्रेलब्लॅझर्सला 8 बाद 118 धावांवर समाधान मानावे लागले. राधानं अखेरच्या षटकात एका रन आऊटसह चार विकेट्स घेतल्या.