Join us  

महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा : मुंबई पोलीस जिमखाना संघाला विजेतेपद 

मुंबई पोलीस जिमखाना संघाने निर्धारित २० षटकात १ बाद १६६ धावांचे लक्ष्य उभारले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 9:45 PM

Open in App

मुंबई : मुंबई पोलीस जिमखाना संघाने अपेक्षेप्रमाणेच कामत मेमोरियल सी.सी. संघाला ३८ धावांनी हरवून अजित घोष स्मृती पहिल्या महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशन, एस.व्ही.आय. एम.एस. यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत मुंबई पोलीस जिमखाना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित २० षटकात १ बाद १६६ धावांचे लक्ष्य उभारले.  सारिका कोळी (४६) आणि रुचिता बुळे (नाबाद ८०) या सलामीच्या फलंदाजांनी ११२ धावांची भागीदारी रचली. सारिकाने ३८ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह ४६ तर रुचीताने केवळ ६४ चेंडूत नाबाद ८० धावा फटकावताना ९ चौकार ठोकले. या आव्हानाचा पाठलाग करताना कामत मेमोरियल संघाने १० धावातच दोन बळी गमावले होते; पण तनिशा गायकवाड (३७) आणि काजल उपाध्याय (४८) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागी रचून संघाच्या आशा वाढविल्या.तनिशा बाद झाल्यानंतर आलेल्या कृतिका कृष्णकुमार हिने काजलच्या साथीने आणखी ३४ धावांची  भर टाकली पण अखेर त्यांना केवळ ५ बाद १२८ धावांचीच मजल मारता आली. कामत मेमोरियल संघाचे तीन फलंदाज धावचीत झाले आणि तेथेच त्यांचा पराभव निश्चित झाला. अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून रुचिता बुळे हिची निवड करण्यात आली. कामत मेमोरीयलच्या वैभवी राजा हिची सर्वोत्तम फलंदाज म्हणून तर निधी घरत (मुंबई पोलीस) हिची सर्वोत्तम गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून कृतिका कृष्णकुमार हिला गौरविण्यात आले. माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू वृंदा भगत, सुरेखा भंडारे,एम.सी.ए. चे अरमान मलिक, नवीन शेट्टी, प्रशांत सावंत आणि दीपक मुरकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी बोलताना अरमान मलिक यांनी महिला क्रिकेटसाठी यापुढे आपला सर्वोतोपरी पाठिबा राहील असे सांगितले. 

संक्षिप्त धावफलक

मुंबई पोलीस जिमखाना – २० षटकात १ बाद १६६ (सारिका कोळी ४६, रुचिता बुळे नाबाद ८०, श्वेता कलपथी नाबाद १९) वि.वि. कामत मेमोरियल स्पोर्ट्स सी.सी. २० षटकात ५ बाद १२८ (तनिशा गायकवाड ३७, काजल उपाध्याय ४८, कृतिका कृष्णकुमार २१) सामनावीर – रुचिता बुळे .

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू – कृतिका कृष्णकुमार (कामत मेमोरियल)स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज वैभवी राजा (कामत मेमोरियल)   स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज – निधी घरत (मुंबई पोलीस).

टॅग्स :मुंबईपोलिस