मुंबई, २५ फेब्रुवारी : पारसी पायोनियरने ग्लोरीयास क्रिकेट क्लबवर शेवटच्या चेंडूवर एका धावेने थरारक विजय मिळवून अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेतील ‘ब’ गट साखळीत विश्वासपूर्ण सुरुवात केली. पारसी पायोनियरने निर्धारित २० षटकांमध्ये ८ बाद ८७ अशी धावसंख्या उभी केली. त्यात इशिता भोसले हिने ३६ चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या. मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेत उद्घाटनाची लढतही चुरशीची झाली. कामात मेमोरियलने ४ बाद १२० धावांची मजल मारल्यावर त्याउत्तरादाखल यजमान स्पोर्टिंग युनियनला ५ बाद ११३ इथवरच प्रगती करता आली.पारसी पायोनियर विरुद्ध ग्लोरीयसला शेवटच्या दोन षटकात १२ धावांची गरज होती. भक्ती धनुने दोन चौकार मारून विजयाच्या आशा पल्लवित केल्या. शेवटी ३ चेंडूत पाच धावा करणे तिला शक्य झाले नाही. शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेवून सामना ‘टाय’ करण्यात तिला अपयश आले. ती धावबाद झाली. ग्लोरीयसने ज्या १९ अवांतर धावा दिल्या त्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला.कामत मेमोरीयलला वैभवी राजने ४८ धावा करून डावाला आकार दिला. तिने तनिशा गायकवाड (२१) हिच्या सोबत दुसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागी केली. त्यानंतर कृतिका कृष्णकुमार हिच्यासह तिने तिसऱ्या विकेटसाठी ३२ धावा जोडल्या. स्पोर्टिंग युनियनच्या प्रियांका गोलीपकर आणि आरोशी तामसे (३०) यांनी प्रयत्न केले पण ते अपुरे ठरले. ग्लोरीयसची डावखुरी फिरकी गोलंदाज कशिश निर्मल (२६/३) हिने चांगली गोलंदाजी केली.
तत्पूर्वी सकाळी भारताच्या माजी आंतर राष्ट्रीय खेळाडू वृंदा भगत यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी स्पर्धेच्या संयोजिका माजी महिला कसोटीवीर अरुंधती घोष, हेमांगी नाईक आणि अन्य महिला क्रिकेटपटू उपस्थित होत्या.
संक्षिप्त धावफलक : कामत मेमोरियल – २० षटकात ४ बाद १२० (तनिशा गायकवाड २१, वैभवी राजा ४८) वि.वि. स्पोर्टिंग युनियन क्लब २० षटकात ५ बाद ११३ (प्रियांका गोलीपकर ३५,आरोशी तामसे ३०) – सर्वोत्तम खेळाडू वैभवी राजा.पारसी पायोनियर २० षटकात ८ बाद ८७ (इशिता भोसले नाबाद ३४, कशिश निर्मल २६/३) वि.वि. ग्लोरीयस क्रिकेट क्लब – २० षटकात ८ बाद ८६ (भक्ती धनु २६, दिशा चांडक १६/२) सर्वोत्तमखेळाडू – इशिता भोसले.