women's T20 world cup 2023 | नवी दिल्ली : सध्या दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. भारतीय संघाला सलामीच्या 2 सामन्यात विजय मिळवता आला मात्र, इंग्लिश संघाने भारताला पराभूत करून टीम इंडियाचा विजयरथ रोखला. साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात भारताने आयर्लंडचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. खरं तर साखळी फेरीतील 4 पैकी 3 सामने जिंकून टीम इंडियाने उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. मात्र, काल झालेल्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यामुळे भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे,
दरम्यान, इंग्लंडने पाकिस्तानचा दारून पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाकिस्तानच्या पराभवामुळे उपांत्य फेरीतील सामन्यांचे चित्र स्पष्ट झाले असून भारतीय महिला ऑस्ट्रेलियाविरूद्ध गुरूवारी उपांत्य फेरीचा सामना खेळतील. तर शुक्रवारी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात उपांत्य फेरीतील दुसरा सामना खेळवला जाईल. भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान असणार आहे. खरं तर मागील काही सामन्यांचा इतिहास पाहिला तर कांगारूच्या संघाने भारताचा बहुतांश वेळा पराभव केला आहे. भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरूद्ध ट्वेंटी-20 मध्ये केवळ 6 सामने जिंकता आले असून 18 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला होता तेव्हा भारतीय महिलांना 1-4 ने ट्वेंटी-20 मालिका गमवावी लागली होती.
भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान याशिवाय मागील वर्षी पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात आणि अंतिम सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. त्यामुळे उद्या भारतीय महिला कांगारूचा पराभव करून इतिहास रचणार का हे पाहण्याजोगे असेल. भारतीय महिला संघाला साखळी सामन्यात इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, आयर्लंडविरूद्ध झालेल्या सामन्यात मराठमोळी स्मृती मानधना चांगल्या लयीत खेळताना पाहायला मिळाली. त्यामुळे भारतीय महिला अंतिम फेरीत प्रवेश करतील अशी अपेक्षा आहे.
उपांत्य फेरीतील सामने
- भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - गुरूवारी, सायंकाळी 6.30 वाजल्यापासून
- इंग्लंड विरूद्ध दक्षिण आफ्रिका - शुक्रवार, सायंकाळी 6.30 वाजल्यापासून
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"