India Women vs Sri Lanka Women, 12th Match : महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने एकदम धमाकेदार खेळ करून दाखवला. सेमीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मोठ्या फरकानं विजय मिळवण्याचं चॅलेंज घेऊन हरमनप्रीत ब्रिगेड दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय महिला संघाने निर्धारित २० षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात १७२ धावा केल्या. यंदाच्या हंगामातील कोणत्याही संघाने उभारलेली ही सर्वोच्च धावसंख्या होती. त्यानंतर गोलंदाजीतही तोच तोरा दाखवत भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघाचा डाव १९.५ षटकात ९० धावांत आटोपला. या सामन्यातील ८२ धावांच्या विजयासह भारतीय संघाने पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या संघाला मागे टाकत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
आधी स्मृती-शेफाली जोडी जमली, अखेरच्या षटकात हरमनप्रीत कौरनं केली तुफान फटकेबाजी
सेमीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रित कौरनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेली महिला क्रिकेट जगतातील सर्वोत्तम सलामी जोडी असलेल्या स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा या दोघींनी आपल्यातील पॉवर दाखवत कर्णधार हरमनप्रीतनं घेतलेला निर्णय सार्थ ठरवला. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी रचली. स्मृती मानधना ३८ चेंडूत ५० धावा करत धावबाद झाली. तिच्या पाठोपाठ शेफाली वर्मा ४० चेंडूत ४३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. जेमिमा रॉड्रिग्जनं १० चेंडूत १६ धावांचे योगदान दिले. पण अखेरच्या षटकात कर्णधार हरमनप्रीत कौरनं सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. २७ चेंडूत नाबाद ५२ धावांची केळी करत तिने संघाच्या धावफलकावर ३ विकेट्सच्यामोबदल्यात १७२ धावा लावल्या. यंदाच्या हंगामातील ही विक्री धावसंख्या आहे.
उत्तम गोलंदाजी अन् अप्रतिम क्षेत्ररक्षण, लंकेचा डाव शंभरीच्या आत खल्लास
यंदाच्या महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकन महिला संघाची सुरुवात खराब झाली. भारतीय महिला संघाकडून झालेली अचूक गोलंदाजी अन् अप्रतिम क्षेत्ररक्षणासमोर श्रीलंकेच्या बॅटर्संनी अक्षरश: गुडघे टेकले. ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्या अन् भारतीय संघाला किमान ४५ धावांनी विजय मिळवण्याची आवश्यकता होती त्यात आणखी काही धावांचा बोनस मिळाला. गोलंदाजीत भारताकडून आशा शोभना आणि अरुंधती रेड्डी यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. याशिवाय रेणुका सिंह हिने २ विकेट्स घेतल्या. श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्मा यांच्याही खात्यात प्रत्येकी १-१ विकेट जमा झाली. श्रीलंकनं महिला संघाचा डाव ९० धावांत खल्लास झाला अन् भारतीय संघाने सेमीच्या शर्यतीत असलेल्या न्यूझीलंडसहपाकिस्तानला मागे टाकले. आता टीम इंडियासमोर शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाचे चॅलेंज असणार आहे. जर इथं टीम इंडियाने बाजी मारली तर सेमीच तिकीट जवळपास निश्चित होईल.