महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात मैदानातील पंचांचा एक निर्णय वादग्रस्त ठरल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंडच्या ताफ्यातील अमेलिया केर १४ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर दुहेही धाव घेताना धावबाद झाली. ती स्वत: तंबूत परतत असताना मैदानातील पंचांनी तिला थांबवले. मैदानातील महिला पंचांच्या या निर्णयावर भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उप कर्णधार स्मृती मानधना दोघीनी नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
रन आउट असूनही तिला पंचांनी का परत बोलावलं?
वादग्रस्त रन आउटमध्ये बचावल्यानंतरही न्यूझीलंडची ती बॅटर फार काळ मैदानात टिकली नाही. रेणुका सिंगन पुढच्याच षटकात तिला बाद केले. पण रनआउट का दिले नाही?, हा मुद्दा कळीचा ठरतोय. जाणून घेऊयात नियम काय सांगतो? मैदानातील पंच न्यूझीलंडच्या बॅटरवर का मेहरबान झाले त्यामागची स्टोरी
११ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जे घडलं ते आश्चर्यचकित करून सोडणारं
न्यूझीलंडच्या संघाने या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पॉवर प्लेमध्ये सलामी जोडीनं आक्रमक अंदाजात फलंदाजी केली. पण त्यानंतर भारतीय महिलांनी कमबॅक केले. अरुंधती आणि आशा शोभना या दोघींनी न्यूझीलंडच्या सलामी बॅटर्संना तंबूत धाडलं. न्यूझीलंडच्या डावातील १४ व्या षटकात जे घडलं ते सर्वांनाच आश्चर्यचकित करून सोडणारे होते.
दुसरी धाव घेण्याच्या नादात रन आउट, ती परत चालली असताना पंचांनी तिला पुन्हा खेळण्याची दिली संधी, कारण
दीप्ती शर्मान टाकलेल्या शेवटच्या चेंडूवर अमेलिया खेर हिने चेंडू हरमनप्रीत कौरच्या दिशेन मारला. यावर तिने अगदी आरामात एक धावही घेतली. नॉन स्ट्राइकला असलेल्या सोफी डिव्हाइन हिने दुसऱ्या धावेसाठी कॉल केला अन् अमेलियाही त्याच्यासाठी तयार झाली. पण हरमनप्रीत कौरनं विकेट किपर रिचा घोष हिच्याकडे परफेक्ट थ्रो केला आणि अमेलिया रन आउट झाली. ती मैदान सोडत असताना चेंडू डेड असल्याचे सांगत पंचांनी तिला नॉट आउट दिले. न्यूझीलंडच्या जोडीनं एक धाव घेतल्यावर मैदानातील पंचांकडून दीप्तीला तिची कॅप दिली होती. याचा अर्थ ती ओव्हर संपली याचा तो सिग्नल होता. धाव घेण्याचा जो प्रकार होता तो डेड बॉलनंतर घडला. त्यामुळेच रन आउट नंतरही अमेलिया खेर पुन्हा खेळताना दिसली.