Smriti Mandhana on Harmanpreet Kaur Injury Health Update, ICC Women's T20 World Cup 2024, INDW vs SLW: भारताच्या महिला क्रिकेट संघाने टी२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध दणकेबाज विजय मिळवला. या विजयासह भारताने गुणांचे खाते उघडले. पण विजयाच्या आनंदासोबतच भारताला त्या सामन्यात एक धक्का बसला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली. पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ती फलंदाजी करत होती. हरमनप्रीतला सूर गवसला होता. ती २४ चेंडूत २९ धावांवर खेळ असताना एक फटका खेळताना तिला झटका बसला आणि तिच्या मानेला दुखापत झाली. त्यानंतर ती मैदान सोडून तंबूत परतली. आज भारताचा श्रीलंकेविरूद्ध 'करो या मरो'चा सामना आहे. त्याआधी संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिने हरमनप्रीतच्या दुखापतीबाबत अपडेट दिली आहे.
हरमनप्रीत आज खेळणार?
हरमनप्रीत चांगल्या फॉर्ममध्ये असताना तिला दुखापत झाली. अशा परिस्थितीत श्रीलंकेविरूद्धचा सामना हरमनप्रीत खेळणार की नाही, याकडे सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. याचसंदर्भात स्मृती मंधानाने ताजी माहिती दिली आहे. स्मृतीच्या म्हणण्यानुसार, हरमनप्रीत कौर आजच्या सामन्यात संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. "हरमनप्रीत आता एकदम ठणठणीत आहे. तिला झालेल्या दुखापतीतून ती सावरली आहे आणि तंदुरूस्त होत आहे. श्रीलंकेच्या सामन्यापर्यंत हरमनप्रीत नक्कीच पूर्ण बरी होऊन मैदानात उतरेल," अशी माहिती स्मृतीने सामन्याच्या पूर्वसंध्येला दिली.
भारतासाठी आजच्या सामन्यात विजय अत्यावश्यक
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना आज दोनही संघांसाठी 'करो वा मरो' सारखाच आहे. भारतीय संघ अ गटात आहे. भारताने २ सामने खेळले असून त्यात न्यूझीलंडविरूद्ध पराभव तर पाकिस्तान विरूद्ध विजय मिळवला आहे. या गटात भारताचा आजचा सामना श्रीलंकेविरूद्ध आहे. या सामन्यात भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवणे क्रमप्राप्त आहे. कारण भारताचा साखळी गटातील पुढील आणि शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाने २ पैकी २ सामने जिंकले असून त्यांचा नेट रनरेट सर्वोत्तम आहे. तर पाकिस्तान, न्यूझीलंड आणि भारत यांनी १-१ सामना जिंकला असला, तरी नेट रनरेटच्या बाबतीत भारत सर्वात खाली आहे. त्यामुळे आजचा सामना मोठ्या फरकाने जिंकून भारताला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवता येईल.