ICC Womens T20 World Cup, 2024 : महिला T20 विश्वचषक स्पर्धेला ३ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी आहेत. बांगलादेश आणि स्कॉटलंड या ब गटातील दोन महिला संघामधील (Bangladesh Women vs Scotland Women, 1st Match, Group B) लढतीनं मुख्य स्पर्धेला सुरुवात होईल. हा सामना शारजहाच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. याशिवाय संध्याकाळच्या सत्रातील सामन्यात अ गटातील पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (Pakistan Women vs Sri Lanka Women, 2nd Match, Group A) अशी लढत नियोजित आहे. भारतीय महिला संघ ४ ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्याने महिला टी-२० वर्ल्ड कपच्या यंदाच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. इथं एक नजर टाकुयात स्पर्धेतील सहभागी संघ आणि महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील खास रेकॉर्ड्सवर
भारतीय महिला संघासह थेट एन्ट्री मिळालेले ६ संघ सर्वाधिक वेळा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकणारा ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, भारत, इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंड हे संघ टॉप ६ फिनिशिंगसह महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या गत हंगामात हे संघ आघाडीच्या सहामध्ये होते.
ICC रँकिंगच्या जोरावर पाकिस्तानी महिला संघाला एन्ट्री
पाकिस्तान महिला संघाने आयसीसी रँकिंगमधील बेस्ट रेटिंगच्या जोरावर यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. पहिल्यांदा महिला टी-२० वर्ल्डमध्ये दिसणाऱ्या स्कॉटलंडच्या संघासह श्रीलंका महिला संघानं पात्रता सिद्ध करून स्पर्धेतील १० मध्ये एन्ट्री मारली असून बांगलादेशच्या संघाला यजमानाचा मान मिळाल्यामुळे त्यांच्यासाठी वर्ल्ड कपचा प्रवास सोपा झाला आहे.
महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कोणत्या गटात कोणता संघ? कसा ठरणार सेमीफायनलिस्ट?
महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी असलेल्या १० संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. राउंड रॉबिन पद्धतीनुसार प्रत्येक संघ आपल्या गटातील अन्य संघासोबत प्रत्येकी एक एक सामना खेळेल. साखळी फेरीतील स्पर्धेनंतर प्रत्येक गटातील आघाडीच्या दोन संघांसाठी सेमीचे दरवाजे खुले होतील.
- अ गटातील संघ - भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि न्यूझीलंड
- ब गटातील संघ- दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडीज, बांगलादेश आणि स्कॉटलंड
८ हंगाम, फक्त ३ चॅम्पियन
महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा यंदाच्या नवव्या हंगामाआधी झालेल्या स्पर्धेत फक्त तीन संघ चॅम्पियन ठरले आहेत. यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने (२०१०,२०१२, २०१४, २०१८,२०२० आणि २०२३ ) सर्वाधिक ६ वेळा जेतेपद पटकावले आहे. २००९ मध्ये झालेल्या पहिल्या हंगामात इंग्लंडच्या संघाने जेतेपद पटकावले होते. तर २०१६ मध्ये वेस्ट इंडीज महिला संघाने ट्रॉफी जिंकली होती.