sanjay manjrekar troll : महिला ट्वेंटी-२० विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यात समालोचन करताना माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी एक विधान केले. या विधानाचा दाखला देत चाहत्यांनी मांजरेकरांची हकालपट्टी करण्याची मागणी बीसीसीसीआय आणि आयसीसीकडे केली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून, चाहत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. शुक्रवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यात किवी संघाने मोठा विजय मिळवत विजयी सलामी दिली. या सामन्यादरम्यान मांजरेकर हिंदीमध्ये समालोचन करत होते.
समालोचन पॅनलमधील इतर सदस्य टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफबद्दल चर्चा करत असताना मांजरेकरांनी केलेले विधान वादग्रस्त ठरत आहे. समालोचनातील इतर सदस्य पंजाबच्या माजी खेळाडूबद्दल भाष्य करत असतो. यावेळी मांजरेकर म्हणतात की, माफ करा, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. उत्तर भारतातील खेळाडूंकडे माझे फारसे लक्ष नसते. मांजरेकरांच्या या विधानावरुन चाहते संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान, भारताच्या महिला संघाला आपल्या सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारताला १६१ धावांचे लक्ष्य दिले होते. पण, भारतीय संघाला निर्धारित २० षटके देखील खेळता आली नाहीत आणि ते १९ षटकांत अवघ्या १०२ धावांत गारद झाले. न्यूझीलंडने ५८ धावांनी विजय मिळवून विजयी सलामी दिली. टीम इंडियाचा पुढील सामना रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे.