भारतीय पुरुष संघ आयसीसी इवेंटमधील व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजामुळे अडचणीत सापडल्याची गोष्ट चांगलीच चर्चेत राहिली होती. ज्यावेळी आपण महिला क्रिकेटचा विचार करतो, त्यावेळी इथं तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाजीचा विषय डोळ्यासमोर उभा राहतो. अखेरच्या टप्प्यात या क्रमांकावर फलंदाजी करताना स्लो स्ट्राईक रेटमुळे माजी कर्णधार आणि स्टार बॅटर मिताली राजलाही टीकेचा सामना करावा लागला होता. यंदाच्या टी- वर्ल्ड कपच्या मोहिम फत्तेह करण्यासाठी तिसऱ्या क्रमाकांवर खेळण्याची जबाबदारी ही कॅप्टन हरमनप्रीत कौरकडे देण्यात आली आहे.
तिसऱ्या क्रमांकाच कोडं सुटलं?
भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मजूमदार यांनी टी-२० वल्ड कपच्या मोहिमेला सुरुवात करण्याआधी तिसऱ्या क्रमांकाचं कोड सोडवल्याचे स्पष्ट केले. या क्रमाकांवर फलंदाजीची जबाबदारी कॅप्टन हरमनप्रीतच्या खांद्यावर असेल, ही गोष्ट स्पष्ट करण्यात आली. हरमनप्रीत कौर ही प्रामुख्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करते. पण यावेळी ती तिसऱ्या क्रमांकावर टीम इंडियाचा आधार होणार आहे.
कधी ठरला हा प्लान?
महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील न्यूझीलंड महिला संघा विरुद्धच्या सलामीच्या लढती आधी अमोल मजूबदार यांनी तिसऱ्या क्रमांकाचा तिढा हा सोडवूनच स्पर्धेसाठी युएईत आल्याचे स्पष्ट सांगितले. बंगळुरुमध्ये लावलेल्या कॅम्पमध्येच तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळणार? या प्रश्नाच उत्तर शोधलं होते, असे ते म्हणाले. सराव सामन्यातही ते दिसून आले. पण यावेळी हरमनप्रीत कौरला फार चमकदार कामगिरी करता आली नव्हती. पहिल्या सामन्यात १० धावा तर दुसऱ्या डावात तिने फक्त एक धाव केली. ही गोष्ट चाहत्यांसह भारतीय महिला संघाचं टेन्शन वाढवणारी आहे. हरमनप्रीत कौर सराव सामन्यात अपयशी ठरली असली, तरी मुख्य स्पर्धेत ती ही जबाबदारी पार पाडण्यात कमी पडणार नाही, असा टीम व्यवस्थापनाला विश्वास आहे. हा विश्वास सार्थ ठरला तरच यंदाच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला नवा इतिहास रचू शकतील.
तिसऱ्या क्रमांकाचे अनेक प्रयोग, शेवटी हरमनप्रीतवर आली जबाबदारी
याआधी भारतीय महिला संघाने तिसऱ्या क्रमांकावर जेमिमा रॉड्रिग्सलाही पसंती दिली होती. पण फिरकी गोलंदाजांविरुद्ध तिचा जो तोरा पाहायला मिळतो तो अधिक जबरदस्त असतो. त्यामुळे तिला लोअर ऑर्डला खेळवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर सास्तिका भाटिया आणि दयालन हेमलता या दोघांनीही इथं आजमावण्यात आले. एवढेच नाही तर सजना सजीवन आणि विकेट किपर बॅटर उमा चेत्रीही वन डाउनला खेळताना दिसली. पण एवढे प्रयोग करून आता शेवटी जबाबदारी कॅप्टन हरमनप्रीत कौरवर आली आहे. या क्रमांकावर जो बदलाचा प्रयोग झालाय ते हा क्रमांक महिला क्रिकेट संघासाठी किती महत्त्वाचा आहे, ते स्पष्ट दिसून येते.
मोठ्या टी-२० कारकिर्दीत मोजक्या सामनयात तिसऱ्या क्रमांकावर खेळलीये हरमनप्रीत कौर
हरमनप्रीत कौर हिने आतापर्यंतच्या तिच्या टी-२० कारकिर्दीत काही मोजक्या सामन्यातच या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. १७३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात फक्त १८ वेळा भारतीय कॅप्टन या क्रमांकावर खेळताना दिसली आहे. यात तिच्या खात्यात २१.२८ च्या सरासरीने २९८ धावा जमा आहेत. ही आकडेवारी हरमनप्रीत कौरसमोर कॅप्टन्सीच्या ओझ्याशिवाय किती मोठं नव चॅलेंज आहे, त्याचा अंदाजा येतो. ती यात यशस्वी होईल, हीच आस क्रिकेट चाहत्यांना असेल.