South Africa Women won 1st Semi Final Australia out ICC Women's T20 World Cup 2024 : महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघानं दमदार विजय नोंदवला आहे. सहा वेळच्या टी-२० वर्ल्ड चॅम्पियन संघाला शह देत दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघानं दिमाखात फायनल गाठलीये. युएईतील दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या सेमी फायनल लढतीत पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन महिला संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात १३५ धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलिया आउट; दक्षिण आफ्रिका महिला संघानं दिमाखात गाठली फायनल
ऑस्ट्रेलियन महिला संघानं सेट केलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना ॲनेके बॉश (Anneke Bosch) हिने नाबाद अर्धशतकी खेळी केली. खणखणीत चौकार मारून तिनं आपल्या संघाला फायनलमध्ये पोहचवले. तिने ४८ चेंडूत केलेल्या नाबाद ७४ धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका महिला संघानं १६ चेंडू आणि ८ विकेट्स राखून सामना जिंकला. दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियन महिला संघाचा यंदाच्या हंगामातील स्पर्धेतील प्रवास इथंच संपुष्टात आला.
फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेसमोर कुणाचे असेल आव्हान?
आता फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर दुसऱ्या सेमीफायनलमधील वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यातील विजेत्या संघाचे आव्हान असेल. दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड (Laura Wolvaardt) हिने ३७ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४२ धावा करत संघाच्या विजयाचा मार्ग सुकर करणारी खेळी केली. तिच्याशिवाय तझमिन ब्रिट्स हिने १५ चेंडूत १५ धावांचे योगदान दिले. क्लोई ट्रायॉन १ धाव करून नाबाद राहिली.
महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रिलियाचा सलग १५ विजयाचा विक्रमी सिलसिला झाला ब्रेक
महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियन महिला संघाचा बोलबाला राहिला आहे. आतापर्यंत झालेल्या ८ हंगामातील ६ हंगामात हा संघ चॅम्पियन ठरला होता. टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत सलग १५ विजय नोंदवत ऑस्ट्रेलियन महिला संघ यंदाच्या हंगामातील उपांत्य फेरीपर्यंत पोहचला. पण दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने त्यांचा विजय रथ रोखत नवा इतिहास रचण्याच्या दिशेन पाऊल टाकले.
८ आकडा अन् ऑस्ट्रेलिया सेमीच्या घाटात फसली
ऑस्ट्रेलियन महिला संघ बाद फेरीतून आउट होण्याची ही तिसरी वेळ ठरली. याआधी महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील २००९ च्या पहिल्या हंगामात इंग्लंड महिला संघाने त्यांना उपांत्य फेरीत मात दिली होती. ओव्हलच्या मैदानात इंग्लंड महिला संघाने ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्स राखून पराभूत केले होते. २०१६ मध्ये कोलकाताच्या मैदानात वेस्ट इंडिज ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत मात देत वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. विशेष म्हणजे या सामन्यातही वेस्ट इंडीजनं ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्सनं मात दिली होती. यावेळी पुन्हा उपांत्य फेरीतील लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्स राखून पराभूत केले. आठ या आकडयाचा कमालीचा योगायोग जुळून आला अन् ऑस्ट्रेलियाची गाडी सेमीच्या घाटात फसली.
Web Title: Women's T20 World Cup : Australia's Game Khallas; South Africa reached the final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.