Join us  

ऑस्ट्रेलियानं लावली न्यूझीलंडची वाट; आता सेमीसाठी टीम इंडिया कशी ठरेल पात्र?

या मोठ्या फरकाने झालेल्या पराभवामुळे न्यूझीलंड महिला संघाचे ( New Zealand Women) निव्वळ धावगती (NRR) मायनसमध्ये गेले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 9:32 AM

Open in App

How India can qualify for the semifinals after Australia's big win over New Zealand  : महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने (Australia Women) यंदाच्या हंगामातील सलग दुसरा विजय नोंदवला. ऑस्ट्रेलिया महिला संघाने (Australia Women) वर्ल्ड कप स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड महिला संघाला ( New Zealand Women) ६० धावांनी पराभूत केले आहे. या मोठ्या फरकाने झालेल्या पराभवामुळे न्यूझीलंड महिला संघाचे ( New Zealand Women) निव्वळ धावगती (NRR) मायनसमध्ये गेले आहे. 

ऑस्ट्रेलिया महिला संघ टॉपला

शाहरजाहच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियन महिला संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात १४८ धावा करत न्यूझीलंडच्या संघासमोर १४९ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ १९.२ षटकात अवघ्या ८८ धावांत आटोपला. या विजयासह ऑस्ट्रेलिया महिला संघ २ सामन्यातील २ विजयासह ४ गुण आणि +२.५२४ निव्वळ धावगती (NRR) 'अ' गटातील गुणतालिकेत टॉपला विराजमान झाला आहे.

या निकालाचा टीम इंडियावर कसा हाईल परिणाम? 

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील निकालानंतर भारतीय महिला संघासमोरील सेमीचं समीकरण अधिक कठीण झाले आहे. सध्याच्या घडीला भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या तिन्ही संघाच्या खात्यात दोन सामन्यानंतर प्रत्येकी २-२ गुण जमा आहेत. पण (+०५५५) नेट रनरेटच्या  जोरावर पाकिस्तानचा संघ 'अ' गटात दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा नंबर लागतो.

भारतीय महिला संघाने उर्वरीत सामने जिंकले तर कसे असेल सेमीच समीकरण 

उपांत्य सामन्यासाठी स्थान पक्के करण्यासाठी भारतीय संघाला उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. एवढेच नाही तर निव्वळ धावगती (NRR) सुधारण्यावरही भर द्यावा लागेल. उर्वरित सामन्यातील विजयासह 'अ' गटात भारतीय संघासह न्यूझीलंड, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे संघ ६ गुणापर्यंत पोहचू शकतात. या परिस्थितीत निव्वल धावगती (NRR) मध्ये आघाडीवर असणारे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

ऑस्ट्रेलियाने सर्व सामने जिंकले तर काय? कसं असेल नवं समीकरण?

जर ऑस्ट्रेलियन संघाने साखळी फेरतील सर्वच्या सर्व सामने जिंकले तर हा संघ ८ गुणांसह थेट उपांत्य फेरीची दावेदारी ठोकताना दिसेल. या परिस्थितीत आणखी एक नवे समीकरण पाहायला मिळू शकते. भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान (Pakistan) हे तीन संघ प्रत्येकी ४-४ गुणांसह सेमीच्या शर्यतीत दिसू शकतील. पुन्हा इथं निव्वळ धावगतीच्या (NRR) जोरावर निवाडा केला जाईल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटचा सामना खेळण्याआधी टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यातच टीम इंडियाला निव्वळ धावगती वाढवण्याची संधी असेल. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्ध ते सहज शक्य नाही.

 

टॅग्स :आयसीसी महिला टी२० विश्वचषकआॅस्ट्रेलियान्यूझीलंडभारतीय क्रिकेट संघ