भारतीय महिला क्रिकेट संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून ५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या रोमांचक सामन्यातील पराभवानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर खूपच भावूक झालेली दिसली. ढसाढसा रडत तिने माजी खेळाडू अंजूम चोप्रा हिला मिठी मारली. हरमनप्रीत कौरने या सामन्यात ३४ चेंडूत ५२ धावांची शानदार खेळी केली. मात्र, ती दुर्दैवीरित्या धावबाद झाली. सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये भारतीय संघाची कर्णधार चष्मा घालून बोलायला आली होती.
सामन्यात काय घडलं?
ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या. संघातर्फे बेथ मुनीने अर्धशतक झळकावले. तिने 37 चेंडूत 54 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी कर्णधार मेग लॅनिंग 34 चेंडूत 49 धावांवर नाबाद राहिली. तिने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. तर अॅशले गार्डनरने १८ चेंडूत ३१ धावा केल्या. भारताकडून शिखा पांडेने 32 धावांत 2 बळी घेतले.
173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. ११च्या स्कोअरवर शेफाली वर्माच्या रूपाने टीमला पहिला धक्का बसला. त्याचवेळी स्मृती मानधनाही 2 धावा करून LBW आऊट झाली. काही वेळाने यस्तिका भाटियाही 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. मात्र, जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी उत्कृष्ट भागीदारी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली.
जेमिमाने 43 धावांची शानदार खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौरने 52 धावांची खेळी केली. यानंतर अखेरच्या षटकात दीप्ती शर्माने वेगवान धावा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही आणि भारतीय संघ 8 विकेट गमावून 167 धावाच करू शकला.
भारतीय कर्णधाराच्या म्हणण्यानुसार, तिला तिच्या देशाने रडताना पाहावे असे वाटत नव्हते आणि म्हणूनच ती चष्मा घालून मॅच प्रेझेंटेशनला आली. हरमनप्रीत म्हणाली,''माझ्या देशाने मला रडताना पाहावे असे मला वाटत नाही, म्हणूनच मी हा चष्मा घालून आले आहे. मी तुम्हाला वचन देते की आम्ही आमचा खेळ आणखी सुधारू आणि देशाची अशी निराशा होऊ देणार नाही. मी ज्या पद्धतीने आऊट झाली त्यापेक्षा दुर्दैवी काहीही असू शकत नाही. जेव्हा मी आणि जेमिमाह रॉड्रिग्ज फलंदाजी करत होतो, तेव्हा सामना आमच्या बाजूने होता. पण त्यानंतर मिळालेली हार अनपेक्षित आहे. मी ज्या प्रकारे धावबाद झाली, त्यापेक्षा दुर्दैवी काहीही असू शकत नाही. प्रयत्न करत राहणे जास्त महत्त्वाचे होते. आम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न केला. निकाल आमच्या बाजूने लागला नाही. पण या स्पर्धेत आम्ही ज्या प्रकारे खेळलो त्यामुळे मी खूश आहे.''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"