Womens T20 World Cup INDW vs PAKW Richa Ghosh pulls off a stunning catch : महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय महिला संघाने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातून दमदार कमबॅक केले आहे. पहिला सामना जिंकून मोठ्या आत्मविश्वासानं मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघातील बॅटरचा भारतीय गोलंदाजीसमोर अजिबात निभाव लागला नाही. पहिल्या ओव्हरमध्ये सलामी जोडी फुटल्यानंतर ठराविक अंतराने पाकिस्तान महिला संघाच्या विकेट्स पडत राहिल्या. या दरम्यान आशा शोभना हिने झेल सोडल्यामुळे क्षेत्ररक्षणाची उणीव पुन्हा दिसून आली. पण तिच्याच गोलंदाजीवर रिचा घोष हिने क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम दर्जा दाखवून दिला.
रिचा घोषनं घेतला सर्वोत्तम कॅच
पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत परतला असताना संघाचा डाव सावरण्याची मोठी जबाबदारी पुन्हा एकदा पाकिस्तानी कॅप्टन फातिमा सना हिच्यावर आली होती. आशा शोभनाच्या गोलंदाजीवर तिने आपली विकेट गमावली. पाकिस्तानच्या धावफलकावर ७० धावा असताना संघाला फातिमा सनाच्या रुपात सहावा धक्का बसला. ही विकेट आशा शोभनाच्या खात्यात जमा झाली असली तरी विकेट मागे रिचा घोष हिने दाखवलेल्या कमालीच्या चपळाईमुळे टीम इंडियाला हे यश मिळाले. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात रिचानं एक साधा झेल सोडला होता. पण तिच्या या कॅचनंतर ती गोष्ट विसरुन तिच्या फिल्डिंगमध्ये सर्वोत्तम दर्जा आहे, हा सीन पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाला.
भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची होती फातिमा सनाची विकेट; कारण
आशियाई चॅम्पियन श्रीलंकन महिला विरुद्धच्या सामन्यात फातिमा सना हिने सर्वात्तम बॅटिंगचा नजराणा पेश करत संघाला अडचणीतून बाहेर काढले होते. त्यामुळेच अर्धा संघ तंबूत परतल्यावर पाकिस्तानी कॅप्टनची विकेट मिळवणं टीम इंडियासाठी महत्वाचे होते. रिचानं सर्वोत्तम झेल पकडत भारतीय संघाला आवश्यक असणारी विकेट्स मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
प्रत्येकीच्या खात्यात जमा झाली विकेट
रेणुकानं पहिल्या षटकात यश मिळवून दिल्यानंतर भारतीय गोलंदाजी ताफ्यात कमालीचा जोश पाहाला मिळाला. दीप्ती शर्मानं सिद्रा अमीनच्या रुपात पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. अरुंधती रेड्डी आणि श्रेयंका पाटील यांच्याशिनाय आशा शोभनालाही एक विकेट मिळाली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करणाऱ्या प्रत्येकीनं या सामन्यात विकेट्स घेतली. भारतीय महिला संघाच्या गोलंदाजीसमोह संघर्ष करणाऱ्या पाकिस्तान संघानं निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात १०५ धावांपर्यंत मजल मारली.