ICC Womens T20 World Cup स्पर्धेत शनिवारी न्यूझीलंडच्या महिला संघानं ७ विकेट्स राखून श्रीलंकेच्या महिला संघावर विजय मिळवला. श्रीलंकेनं विजयासाठी ठेवलेलं १२८ धावांचं लक्ष्य न्यूझीलडनं १७.४ षटकांत ३ बाद १३१ धावा करून पार केले. या सामन्यात न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईननं नाबाद ७५ धावा करताना विश्वविक्रमाला गवसणी घातली. आतापर्यंत पुरुष किंवा महिला क्रिकेटपटूला असा विक्रम करता आलेला नाही.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सोफीचे हे सलग सहावे अर्धशतक ठरले. तिने श्रीलंकेच्या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सलग चार सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती. तत्पूर्वी तिनं भारताविरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं. पुरुष किंवा महिला क्रिकेटपटूंमध्ये सलग सहा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत अर्धशतकी किंवा त्याहून अधिक धावांची खेळी करणारी सोफी ही पहिलीच खेळाडू ठरली आहे. शिवाय मागील ९ ट्वेंटी-२० सामन्यांत तिनं आठ वेळा ५०+ धावा केल्या आहेत.
सोफीनं नाबाद ७५ धावा करून आणखी एक विक्रम नावावर केला. धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. यापूर्वी न्यूझीलंडच्या जेस वॉटकिननं २०१८मध्ये आयर्लंडविरुद्ध नाबाद ७७ धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करताना महिला कर्णधारानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. न्यूझीलंडच्या अॅमी वॉटकिननं २००९च्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ७३ धावा केल्या होत्या. पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये ही दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली. या विक्रमात वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल ( २००९ वर्ल्ड कप वि. ऑस्ट्रेलिया) ८८ धावांसह अव्वल स्थानावर आहे.
सोफीच्या मागील सहा सामन्यांच्या धावा७२ ( वि. भारत) , ५४*, ६१, ७७, १०५ ( वि. दक्षिण आफ्रिका) व ७५* ( वि. श्रीलंका)