प्रॉव्हिडेन्स(गयाना) : क्रिकेटच्या झटपट प्रकारात आतापर्यंत प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाला आज शुक्रवारपासून येथे सुरू होत असलेल्या टी-२० विश्वचषकाच्या सलामीला न्यूझीलंडविरुद्ध दोन हात करायचे आहे. सकारात्मक खेळासह स्पर्धा जिंकण्याच्या इराद्याने भारत सुरुवात करू इच्छितो.
भारतीय महिला संघ ५० षटकांच्या तुलनेत २० षटकांच्या सामन्यात प्रभावी कामगिरी करू शकलेला नाही. वन डे विश्वचषकात भारताने अंतिम फेरी गाठली पण निर्णायक लढतीत इंग्लंडकडून पराभवाचे तोंड पहावे लागले होते. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि नवनियुक्त कोच रमेश पोवार यांच्यानुसार संघाने त्या पराभवापासून धडा घेतला असून युवा खेळाडूंच्या समावेशामुळे संघात अधिक निर्भिडपणा आला आहे. भारताच्या सहा खेळाडू पहिल्यांदा विश्वचषक खेळत आहेत. मागील पाच टी-२० विश्वचषकात भारत कधीही अंतिम फेरीत दाखल झाला नव्हता. २००९ आणि २०१० मध्ये या संघाने उपांत्यफेरीत धडक दिली होती. पुरुषांच्या टी-२० विश्वचषकापासून वेगळे आयोजन होण्याची महिला विश्वचषकाची ही पहिलीच वेळ. याआधी महिला आणि पुरुष टी-२० विश्वचषक एकाचवेळी आयोजित व्हायचे. स्पर्धेपूर्वी भारतीय संघ जबर फॉर्ममध्ये आहे.
श्रीलंकेला त्यांच्या देशात व त्यानंतर आॅस्ट्रेलियाच्या अ संघाला मायदेशात हरविले होते. येथे सराव सामन्यात वेस्ट इंडिज आणि इंग्लंडला लोळविल्यामुळे आत्मविश्वासात भर पडली. सलामीची फलंदाज आणि उपकर्णधार स्मृती मानधना म्हणाली,‘जूनमध्ये झालेल्या आशिया चषक टी-२० फायनलमध्ये बांगला देशकडून झालेल्या पराभवानंतर आम्ही चांगलेच सावध झालो. मायदेशात परतल्यापासून आंतरराष्टÑीय पातळीवर आवश्यक असलेली कामगिरी करण्यावर भर दिला. गोलंदाजीतही गेल्या तीन महिन्यात कमालीची सुधारणा झाली आहे. डावपेच आखण्यात तरबेज झालो. क्षेत्ररक्षण देखील मागील विश्वचषकाच्या तुलनेत दहा टक्क्यांनी सुधारले आहे.’
मिताली राज आणि मानधना यांच्या सलामी जोडीनंतर मधल्या फळीत जेमिमा रॉड्रिग्ज, तान्या भाटिया आणि स्वत: हरमन कौर यांच्यावर धावा काढण्याची जबाबदारी असेल.
फिरकीचे नेतृत्व लेगस्पिनर पुनम यादवकडे असून वेगवान झुलन गोस्वामी निवृत्त झाल्यामुळे फरकी भारताचे प्रमुख शस्त्र असेल. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी पाकिस्तान, १५ नोव्हेंबर रोजी आयर्लंड आणि १७ नोव्हेंबर रोजी तीन वेळेचा चॅम्पियन आॅस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळायचा आहे.(वृत्तसंस्था)
‘‘या संघाकडून मला मोठ्या अपेक्षा आहेत. वैयक्तिक कामगिरी सुधारल्यास भारतीय महिला क्रिकेटचा विकास होईल, याची माझ्या खेळाडूंना जाणीव आहे. भारतीय प्रेक्षक आणि जगातील चाहते त्यांचे फॅन बनू शकतात. अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये विक्रम होतात आणि विक्रम मोडलेही जातात. त्यामुळे जगाचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाते.’’ - रमेश पोवार, प्रशिक्षक
हरमनप्रीतची तुफानी खेळी,भारताचा इंग्लंडवर विजय
प्रॉव्हिडेन्स(गयाना) : कर्णधार हरमनप्रीत कौरच्या ३२ चेंडूतील नाबाद ६४ धावांच्या तुफानी खेळीच्या बळावर भारताने आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाच्या सराव सामन्यात बुधवारी इंग्लंडचा ११ धावांनी पराभव केला. हरमनने सहा चौकार आणि तीन षटकार मारल्२ो. यामुळे भारताने निर्धारित २० षटकांत ६ बाद १४४ धावा उभारल्या. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला ८ बाद १३३ धावांत रोखले. सलामीच्या डॅनियल व्हाईटने सर्वाधिक ५४ धावा केल्या. भारताकडून पूनम यादवने तीन तर राधा यादव आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. स्मृती मानधना(१३), जेमिमा रॉड्रिग्ज(२१), मिताली राज(१८), वेदा कृष्णमूर्ती(३), डी. हेमलता(००)या लवकर बाद झाल्यामुळे भारताने अर्धा संघ ७० धावांत गमविला होता. हरमनसोबत दीप्ती शर्मा(१८) हिने सहाव्या गड्यासाठी ५४ धावांची भागीदारी करीत आव्हानात्मक मजल गाठून दिली.
Web Title: Women's T20 World Cup starts on Caribbean Islands
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.