Join us  

महिला टी-२० : सुपरनोवास विजयी

अखेरच्या चेंडूवर ट्रेझलब्लेझर्सला नमविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 1:26 AM

Open in App

मुंबई : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात सुपरनोवास संघाने ३ गड्यांनी बाजी मारताना ट्रेलब्लेझर्स संघाचा विशेष टी-२० प्रदर्शनीय सामन्यात पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ट्रेलब्लेझर्स संघाने २० षटकांत ६ बाद १२९ धावांची मजल मारल्यानंतर सुपरनोवास संघाने २० षटकांत ७ फलंदाजांच्या मोबदल्यात १३० धावा केल्या.वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या विशेष सामन्यात नाणेफेक जिंकून सुपरनोवास संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि ट्रेलब्लेझर्स संघाला मर्यादित धावसंख्येत रोखले. मिळालेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मिताली राज (२२) आणि डॅनियली वॅट (२४) यांनी सुपरनोवास संघाला ४७ धावांची दमदार सलामी दिली. एक वेळ सुपरनोवास संघ ९ षटकांत ३ बाद ७१ धावा अशा सुस्थितीत होता.या वेळी ते सहज बाजी मारतील, असे दिसत होते. मात्र, अखेरच्या ५ षटकांमध्ये ट्रेलब्लेझर्स संघाने टिच्चून मारा करताना २० धावांत ४ बळी घेऊन सामना चुरशीचा केला. एलिस पेरी हिने १४ चेंडंूत नाबाद १३ धावांची संयमी खेळी करीत संघाला विजयी केले. तसेच, मितालीने १७ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह २२ आणि वॅटने २० चेंडूंत २ चौकार व एका षटकारासह २४ धावांची खेळीकरून संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. कर्णधार हरमनप्रीत कौर (२१) आणि सोफी डिव्हाईन (१९) यांनीही चांगली फलंदाजी केली. पूनम यादव व सूझी बेट्स यांनी प्रत्येकी २ बळी घेऊन सामना रंगतदार केला.तत्पूर्वी, सूझी बेट्स (३२), युवा जेमिमा रॉड्रिग्ज (२५) आणि दीप्ती शर्मा (२१) यांच्या जोरावर ट्रेझलब्लेझर्स संघाने अडखळत्या सुरुवातीनंतर समाधानकारक मजल मारली. अलीसा हिली (४) - कर्णधार स्मृती मानधना (१४) ही सलामीची जोडी झटपट परतल्यानंतर सूझी, दीप्ती आणि जेमिमा यांनी संघाला सावरले. सूझीने ३७ चेंडूंत २ चौकारांसह ३२ धावांची संयमी खेळी केली. दीप्तीनेही २२ चेंडूंत ३ चौकारांसह २१ धावा केल्या.

टॅग्स :महिला टी-२० क्रिकेट 2018टी-२० क्रिकेटक्रिकेटसुपरनोवाट्रेलब्लेजर्स