होबार्ट : चार वर्षांपूर्वी आपल्या एका महिला सहकाऱ्याला अश्लील मेसेज व फोटो पाठविल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (सीए) वतीने सुरू असलेल्या चौकशीदरम्यानच टिम पेन याने ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. पेनने शुक्रवारी कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे ८ डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाला मायदेशात इंग्लंडविरुद्ध प्रतिष्ठेची ॲशेस मालिका खेळायची असल्याचे त्याआधी पेनने अशी भूमिका घेतल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला धक्का बसला आहे.
पेनने २०१७ साली एका महिला सहाकाऱ्याला हे अश्लील मेसेज व फोटो पाठवले होते. यानंतर काही महिन्यांनीच पेनचे तब्बल ७ वर्षांनी कसोटी संघात पुनरागमन झाले होते. त्यावेळी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट टास्मानियाच्या चौकशीमध्ये पेनला क्लीन चीट मिळाली होती.पेनने प्रसारमाधमांशी संवाद साधताना म्हटले की, ‘मी आज ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडत आहे. माझ्यासाठी हा अत्यंत कठीण निर्णय आहे; पण हा निर्णय माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी आणि क्रिकेटसाठी योग्य आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी मी त्यावेळच्या माझ्या एका महिला सहकारीला मेसेज केला होता. त्यासाठी मी तिची माफीही मागितली होती आणि आजही मागतो. मी माझ्या पत्नी आणि कुटुंबीयांशीही चर्चा केली होती आणि त्यांनी केलेली क्षमा, तसेच सहकार्यासाठी आभारी आहे.’
पेनने कर्णधारपद सोडले असले, तरी तो संघाचा सदस्य कायम राहील. २०१८ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणानंतर पेनकडे ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याचा राजीनामा स्वीकार केला असून आता पुढील कर्णधाराचा शोध सुरू आहे.
यष्टीरक्षक-फलंदाज टिम पेनने ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा घेतलेला निर्णय दु:खद असून, यामुळे आम्ही निराश आहोत. पण आम्ही त्याच्या निर्णयाचा मान राखतो’, असे सांगत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर संघटनेने (एसीए) ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी कर्णधार टिम पेन याला पाठिंबा दिला.
चार वर्षांपूर्वी एका महिला सहकारीला अश्लील मेसेज आणि फोटो पाठविल्याप्रकरणी सुरु असलेल्या चौकशीदरम्यान पेनने शुक्रवारी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.
एसीएने म्हटले की, ‘आम्ही टिम पेनद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयाचा मान राखतो. पण आम्ही निराश आहोत की, त्याला ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद सोडावेसे वाटले.