IPL 2022, Delhi Capitals : रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा संघ इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाला आहे. २०२०मध्ये रिषभच्या नेतृत्वाखाली दिल्लीने प्रथमच आयपीएल फायनल गाठली होती आणि त्यानंतर IPL 2021मध्ये प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता. पण, चेन्नई सुपर किंग्सकडून त्यांना हार पत्करावी लागली होती. आता सलग तिसऱ्या पर्वात दिल्ली प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहे. पण, दिल्लीचा संघ प्ले ऑफपर्यंत पोहोचू शकत नाही, असा दावा करण्यात आला आहे.
दिल्लीने आयपीएल २०२२साठी संघात पृथ्वी शॉ, रिषभ पंत, अक्षर पटेल, एन्रिक नॉर्खिया यांना कायम राखले. त्यांना कागिसो रबाडा, शिखर धवन, मार्कस स्टॉयनिस व श्रेयस अय्यर या स्टार खेळाडूंना बाहेर करावे लागले, परंतु त्यांनी आयपीएल २०२२च्या मेगा ऑक्शनमध्ये डेव्हिड वॉर्नर, शार्दूल ठाकूर, रोव्हमन पॉवेल व कुलदीप यावद यांना आपल्या ताफ्यात घेतले. अनेकांच्या मते दिल्ली कॅपिटल्स हा जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे, परंतु भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा ( former India cricketer Aakash Chopra ) याला तसे वाटत नाही.
वॉर्नर, मार्श आणि मुस्ताफिजूर रहमान हे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे आणि नॉर्खियाच्या फिटनेसबाबत अजूनही शंका आहे. चोप्राच्या मते यंदाच्या पर्वातील पहिल्या तीनपैकी दोन सामने दिल्ली सहज गमावेल आणि हा निकाल त्यांना महागात पडेल. २७ मार्चला त्यांचा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध आहे. ''मला या संघाची चिंता वाटतेय.. पहिल्या तीन लढतींपैकी ते दोन सामने सहज गमावतील. जर ते तीनही हरले तर, असंही होऊ शकतं. एका खेळाडूच्या जीवावर तुम्ही कदाचित काहीवेळेस जिंकू शकता, परंतु त्याने संघ म्हणून तुमचा आत्मविश्वास वाढणार नाही,''असे चोप्रा म्हणाला.