क्रिकेट प्रशिक्षक नरेश चुरी यांचे निधन मनाला चटका लावून जाणारे, कार्याचा गौरव व्हावा!

जेमतेम वयाची साठी झालेल्या चुरी यांचे ३० सप्टेंबरला आकस्मिक निधन झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2024 09:48 AM2024-10-07T09:48:47+5:302024-10-07T09:49:27+5:30

whatsapp join usJoin us
work of naresh churi should be glorified | क्रिकेट प्रशिक्षक नरेश चुरी यांचे निधन मनाला चटका लावून जाणारे, कार्याचा गौरव व्हावा!

क्रिकेट प्रशिक्षक नरेश चुरी यांचे निधन मनाला चटका लावून जाणारे, कार्याचा गौरव व्हावा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

संजीव पाध्ये, लेखक

ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक नरेश चुरी यांचे ३० सप्टेंबरला आकस्मिक निधन झाल्याची बातमी आली आणि  क्रिकेट चाहते शोकाकुल  झाले. अगदी आतापर्यंत मैदानावर क्रिकेटपटू घडविणारे आणि जेमतेम वयाची साठी झालेल्या चुरी यांचे अचानक  जाणे अनेकांच्या मनाला चटका लावून गेले.   

  क्रिकेटला त्यांनी पुरते  वाहून घेतले होते. अलीकडेच ते पुण्यात स्थायिक होऊ पाहत होते.  त्याच्या आधी सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील मालवण, कुडाळ, कणकवली येथे   मुलांना ते क्रिकेटचे धडे  देत  होते. त्यांना द्रोणाचार्य  आचरेकर  सरांचे नाव  आताही उंच करायचे होते. सर आजारी पडल्यावर नरेश  चुरी यांनी १९९९ पासून  शारदाश्रम शाळेचे   क्रिकेट  प्रशिक्षक पद सांभाळले होते. काही  काळ रूपारेल कॉलेजसाठी त्यांनी प्रशिक्षक  म्हणून  जबाबदारी  पार  पाडली होती.  त्यांनी  उत्तमोत्तम क्रिकेटपटू  मुंबईला  दिले  होते. अभिषेक नायर तर  भारतीय संघाचा  सहायक  प्रशिक्षक  आहे. शिवाजी पार्क येथे  मुलांना  प्रशिक्षण देताना  त्याने नरेश चुरींना खास प्रेरक म्हणून आमंत्रण दिले, याचा  खूप चांगला परिणाम  मुलांवर  झाला. 

  साहिल कुकरेजा, ओंकार  गुरव, आनंद सिंग, सचिन  यादव, असे  किती  तरी  रणजीपटू त्यांनी घडवले. त्यांनी नुकतीच आचरेकर सर क्रीडा  न्यासची स्थापना केली  होती. हेतू  हा  की, क्रिकेट व इतरही  खेळांत ज्या मुलांना गती असेल त्यांना प्रोत्साहन मिळवून द्यावे. आचरेकर  सरांचे अलौकिक कार्य जगासमोर अधिक प्रभावीपणे यावे, यासाठी त्यांच्यावर ‘आचरेकर सर  आणि  मी’ हे पुस्तक लिहिल्यानंतर त्यावर बेतलेला चित्रपट काढायचा संकल्प त्यांनी सोडला  होता. या  चित्रपटाची जुळवाजुळव सुरू होती. सरांच्या  आयुष्यातील घटना व किस्से  सांगणाऱ्या पुस्तकाचे त्यांनी माझ्याकडून शब्दांकन करून घेतले होते. 

क्रिकेटसाठी  मेहनत घेणाऱ्या त्यांना काळाने  आकस्मिक ओढून नेल्याने दुःख होणे   साहजिकच  आहे. मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात त्यांना मरणोत्तर द्रोणाचार्य  पुरस्कार लाभावा, अशी  भावना व्यक्त होत आहे. यासाठी क्रीडा खात्याने प्रयत्न करावेत,  अशी अनेकांची इच्छा आहे.  त्यांची कहाणी खरोखर विलक्षण आहे. लोक एखादे मूल दत्तक घेतात त्यामागे  सर्वसाधारण दोन-तीन कारणे असतात. इस्टेटला वारस हवा, निपुत्रिक असल्याने माया लागावी म्हणून वगैरे; पण मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबईत कसोटी सामने  असताना एखाद्या सदस्याला आणि त्याच्या मुलालाच प्रवेश पास देते. अशा वेळी आचरेकर सरांनी एका  होतकरू मुलाला दत्तक घेतले. रमाकांत आचरेकर यांना पाच मुली होत्या;   पण त्यांनी केवळ या मुलाला जवळून क्रिकेट पाहता यावे, शिकता यावे, यासाठी  नरेश कमलाकर चुरी यांना  दत्तक घेतले होते. या मुलामध्ये ठासून  गुणवत्ता होती म्हणूनच त्यांनी असा निर्णय  घेतला होता. नरेश चुरी यांच्या कार्य कर्तृत्वाचा गौरव व्हायलाच हवा.

 

Web Title: work of naresh churi should be glorified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.