भारत - पाकिस्तान क्रिकेट सामन्याची सर्वांनाच उत्सुकता असते. दोन्ही देशांमधील संबंध लक्षात घेता उभय संघांमध्ये द्विदेशीय मालिका होत नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) स्पर्धांत हे संघ एकमेकांना भिडतात. दोन संघांतील अनेक अविस्मरणीय क्षण आजही क्रिकेटचाहत्यांच्या आठवणीत आहेत. त्यामुळे उभय संघांमध्ये द्विदेशीय मालिकेची संपूर्ण जगाला उत्सुकता आहे, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने व्यक्त केले आहे.
तो म्हणाला,''भारत-पाकिस्तान मालिका सुरू व्हावी अशी संपूर्ण जगाची इच्छा आहे. जग आतुरतेनं त्याची वाट पाहत आहे. अॅशेस मालिकेची जशी सर्वांना उत्सुकता असते तशीच भारत-पाकिस्तान मालिकेची आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिका होणार नाही, अशी कल्पना कुणी करू शकत का? अॅशेस किंवा भारत-पाकिस्तान यांच्यातील मालिका यामध्ये जो जोश असतो, तो कुठे पाहायला मिळत नाही. पण, दुर्दैवानं भारत-पाकिस्तान मालिका होत नाही.''
''भारतीय क्रिकेटपटूंचा पाकिस्तानमध्येही चाहतावर्ग आहे. माझे असे अनेक मित्र आहेत, जे भारतीय क्रिकेटपटूंचे कौतुक करतात. तसंच पाकिस्तानी खेळाडूंनाही भारतातील चाहते प्रेम करतात. त्यामुळे दोन देशांमधील क्रिकेट मालिका लवकर सुरू झालेली पाहयाला मला आवडेल,''असेही मलिक म्हणाला.
2009च्या चॅम्पयन्स ट्रॉफीतील भारताविरुद्धची 128 धावांची खेळी आणि 2004च्या आशिया चषक स्पर्धेतील शतक हे अविस्मरणीय क्षण असल्याचे मलिकनं सांगितले. तो म्हणाला,''2009च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत मी 128 धावा केल्या होत्या आणि त्यासाठी मला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कारही मिळाला होता. 2004च्या आशिया चषक स्पर्धेत भारताविरुद्ध 127 चेंडूंत 143 धावा आणि सचिन तेंडुलकर व युवराज सिंग यांची घेतलेली विकेट, हे क्षण अविस्मरणीय आहेत. त्याशिवाय 2004मध्येच कोलकाता येथी 293 धावांचा पाठलाग आम्ही केला होता आणि तेही ईदच्या एक दिवस आधी.''
'अंडरटेकर'वर कोसळला दुःखाचा डोंगर; मोठ्या भावाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन