भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकर यानं सोमवारी जागतिक रक्तदान दिनाचं औचित्य साधून रक्तदान केलं आणि त्यानं नागरिकांनाही पुढाकार घेऊन रक्तदान करण्याचं आवाहन केलं. तेंडुलकरनं सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून रक्तदान केल्याची माहिती दिलीच, शिवाय त्यानं रक्तदानाचे महत्त्वही समजावून सांगितले. यावेळी त्यानं रक्ताच्या तुटवड्याचा त्याच्या जवळच्या व्यक्तीला आलेला अनुभवही सांगितला.
'मिशन ऑक्सिजन'साठी सचिन तेंडुलकरची १ कोटींची मदत!सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) यानं ‘Mission Oxygen’ या उपकरर्मात सहभाग घेतला आहे आणि त्यानं स्वतः १ कोटींची मदत जाहीर केली आहे. त्यानं इतरांनाही या चळवळीत हातभार लावण्याचं आवाहन केलं आहे. तो म्हणाला,''कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण केला आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवणे ही सध्याच्या तासाची गरज बनली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहून दुःख होत आहे. २५०+ अधिक युवा उद्योजकांनी मिशन ऑक्सिजनची सुरूवात केली आहे. त्याच्या माध्यमातून ते निधी गोळा करून ऑक्सिजन खरेदी करणार आहेत आणि देशातील हॉस्पिटल्सना दान करणार आहेत.''
सचिननं नुकतीच कोरोनावर मात केली आणि त्यानंतर त्यानं एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात त्यानं प्लाझ्मा दान करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. तो म्हणाला होता की,''मागील महिना माझ्यासाठी खडतर होता. माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि मी २१ दिवस आयसोलेट झालो.'तुमच्या प्रार्थना व शुभेच्छा, माझ्या कुटुंबीयांच्या, मित्रांच्या प्रार्थना व शुभेच्छा आणि डॉक्टर्स व मेडिकल स्टाफ... त्यांनी माझ्यात सतत सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आणि मला बरं केलं. या सर्वांचे खूप खूप आभार. ''
कोरोनावर मात केल्यानंतर प्लाझ्मा दान करण्याचा संकल्प करणाऱ्या महान फलंदाज सचिन तेंडुलकरने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत प्रत्येकी 25 लाखांची मदत केली होती.