गुवाहाटी - नुकत्याच झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत यश धुलने आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर आता यश धुलने रणजी करंडक स्पर्धेतही मोठा धमाका केला असून, यशने दिल्लीकडून पदार्पण करताना पदार्पणातच शतकी खेळी केली आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षी रणजी करंडक स्पर्धा रद्द करावी लागली होती. मात्र यावेळी काही बदलांसह ही स्पर्धात होत आहे.दिल्ली आणि तामिळनाडू यांच्यात सुरू असलेल्या लढतीमधून यश धुलने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करत तामिळनाडूच्या गोलांदाजंची धुलाई केली. त्याने १३३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याबरोबरच यश धुलने रणजी करंडक स्पर्धेत शतक ठोकणाऱ्या सचिन तेंडुलकरसह काही मोजक्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले. अखेरीस ११३ धावा काढून यश बाद झाला.