टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा संपल्यानंतर काही तासांनीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) लॉस एंजेलिस येथे २०२८ साली होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली. यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वाची उत्सुकता वाढली. आयसीसीच्या या घोषणेमुळे आशियाई देशांमध्ये जोरदार स्वागत झाले.
क्रिकेट हा खेळ हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या देशांमध्येच खेळला जात असला तरी याची लोकप्रियता मात्र करोडोंच्या घरात आहे. त्यामुळेच जर का ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला, तर जगभरात क्रिकेटची हवा होईल हे नक्की. क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिकमध्ये टी-२० क्रिकेटच्या रुपाने होऊ शकतो. अनेक माजी क्रिकेटपटूंनीही अशी इच्छा व्यक्त केली आहे.
सध्या आगामी बर्मिंगहॅम (२०२२) राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या टी-२० स्पर्धेद्वारे क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. त्यामुळे भविष्यात ऑलिम्पिकमध्येही क्रिकेटच्या स्पर्धा रंगल्यास आश्चर्य वाटायला नको.
आतापर्यंत का नाही झाला समावेश?
जगभरात मोजक्याच देशांमध्ये क्रिकेट खेळला जात असला, तरी आशियामध्ये मात्र क्रिकेटचे वेड जबरदस्त आहे. मात्र, ऑलिम्पिकमध्ये समावेश नसल्याने क्रिकेटकडे अद्याप जागतिक स्तरावरील खेळ म्हणून पाहिले गेले नाही. खरं म्हणजे क्रिकेट सामन्यांचे निकाल लागण्यास बराच वेळ लागतो. याच कारणामुळे अद्याप ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झालेला नाही.
ब्रिटनकडे एकमेव सुवर्ण
- १९०० सालच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला होता. मात्र त्यावेळी, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, नेदरलँड्स आणि बेल्जियम यांचाच सहभाग क्रिकेटमध्ये झाला होता.
- काही कारणास्तव नेदरलँड्स आणि बेल्जियमने माघार घेतल्यानंतर ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यामध्ये थेट सुवर्ण पदकाची दोनदिवसीय लढत खेळविण्यात आली.
- यामध्ये ब्रिटनने १५८ धावांनी अपेक्षित बाजी मारत सुवर्ण पदक पटकावले. त्यामुळे ब्रिटनकडे क्रिकेटमधील एकमेव ऑलिम्पिक सुवर्ण पदक आहे.
लंडनमध्ये झाले कौतुक
- १९०० सालच्या ऑलिम्पिकमध्ये खेळ म्हणून समाविष्ट झालेला क्रिकेट, पुन्हा २०१२ सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये पाहण्यास मिळाला.
- उद्घाटन सोहळ्यादरम्यान ग्रेट ब्रिटनने क्रिकेट या राष्ट्रीय खेळाची एक झलक सादर केली होती.
- त्यावेळी, प्रचंड उत्साहाने क्रीडाप्रेमींनी क्रिकेटचे कौतुक केले होते. त्यामुळे भविष्यात क्रिकेट ऑलिम्पिकमधील प्रमुख खेळापैकी एक झाल्यास नवल वाटणार नाही.
मुख्य अडचणी काय?
- मोठ्या संख्येने स्टेडियम्सची गरज.
- संघांची संख्या जितकी जास्त, तितका स्पर्धेचा कालावधी वाढणार.
- यजमान देशात क्रिकेटची क्रेझ नसल्यास, या खेळास विरोध होऊ शकतो.
- क्रिकेटचे संचलन स्वतंत्रपणे केले जाते. ऑलिम्पिकमध्ये समावेश झाल्यानंतर क्रिकेट संचलनात सरकारी हस्तक्षेप होण्याची आयसीसीला भीती.
Web Title: In the world of cricket, will the curiosity of the Olympics be more of an honor than the World Cup?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.