दुबई : भारताच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्याच्या तारखेत बदल करण्यात आला. मात्र, आयसीसीने या सामन्यासह एकूण ९ सामन्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल केले. आयसीसीने हे सुधारीत वेळापत्र बुधवारी जाहीर केले असून यामध्ये भारताच्या दोन सामन्यांचा समावेश आहे.
जुन्या वेळापत्रकानुसार भारत-पाकिस्तान लढत १५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे रंगणार होता. मात्र, या दिवशी घटस्थापना असल्याने नवरात्रीला सुरुवात होणार आहे. या दिवशी अहमदाबादमध्ये पोलीस सुरक्षा व्यवस्था विविध ठिकाणी व्यस्त असल्याने क्रिकेट सामन्यास सुरक्षा पुरवणे पोलिसांना शक्य होणार नसल्याचे बीसीसीआयला कळविण्यात आले होते. त्यावर विचार करत आयसीसी आणि बीसीसीआयने हा सामना १४ ऑक्टोबरला याच ठिकाणी खेळविण्याचे निश्चित केले आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डनेही (पीसीबी) यावर सहमती दर्शवली होती.
आयसीसीने नव्या वेळापत्रकामध्ये भारताच्या दोन, तर पाकिस्तानच्या तीन सामन्यांमध्ये बदल केला आहे. पाकिस्तानचा श्रीलंकेविरुद्धचा १२ ऑक्टोबरला होणारा सामना १० ऑक्टोबरला हैदराबादमध्ये खेळविण्यात येणार असून इंग्लंडविरुद्धचा १२ नोव्हेंबरला इडन गार्डन्सवर होणारा सामना ११ नोव्हेंबरला खेळविण्यात येईल. तसेच, भारताचा नेदरलँड्सविरुद्धचा सामना ११ नोव्हेंबरऐवजी १२ नोव्हेंबरला बंगळुरु येथे खेळविण्यात येईल.
विश्वचषकातील ९ सामन्यांचे सुधारित वेळापत्रक १० ऑक्टोबर - इंग्लंड वि. बांगलादेश ( १०.३० वा. पासून सुरु. आधी दुपारी २ वाजल्यापासून) १० ऑक्टोबर - पाकिस्तान वि. श्रीलंका ( २ वा. पासून) (आधी १२ ऑक्टोबर) १२ ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका ( २ वा. पासून) (आधी १३ ऑक्टोबर) १३ ऑक्टोबर - न्यूझीलंड वि. बांगलादेश ( २ वा. पासून) (आधी १४ ऑक्टोबर) १४ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान ( २ वा. पासून) (आधी १५ ऑक्टोबर) १५ ऑक्टोबर - इंग्लंड वि. अफगाणिस्तान ( २ वा. पासून) (आधी, १४ ऑक्टोबर) ११ नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश ( १०.३० वा. पासून) (आधी १२ नोव्हेंबर) ११ नोव्हेंबर - इंग्लंड वि. पाकिस्तान ( २ वा.पासून) (आधी १२ नोव्हेंबर) १२ नोव्हेंबर - भारत वि. नेदरलँड्स ( २ वा. पासून) (आधी ११ नोव्हेंबर)