लखनौ : अफगाणिस्तान संघ उत्कृष्ट फिरकी गोलंदाजीच्या बळावर वनडे विश्वचषकात शुक्रवारी रंगणाऱ्या लढतीत नेदरलँड्सविरुद्ध विजयाचा प्रबळ दावेदार असेल. इकानाची खेळपट्टी गुंतागुंत वाढविणारी असल्याने अफगाण संघाला विजयासह धावगती वाढविण्याचे आव्हान असेल. या संघाचे सहा, तर नेदरलँड्सचे चार गुण आहेत. उपांत्य फेरीच्या चढाओढीत कायम राहायचे झाल्यास मोठ्या विजयाचीच गरज असेल.
अफगाणिस्तानने इंग्लंडपाठोपाठ श्रीलंकेला नमवून उपांत्य फेरीकडे कूच केली आहे. याआधी २००३ च्या विश्वचषकात केनियाने अशा धक्कादायक विजयांसह उपांत्य फेरीत धडक दिली होती. अफगाण संघाचे पुढील सामने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध आहेत.
नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशला धूळ चारली. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघांचे ६-६ गुण असल्यामुळे दोन्ही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत. पण, धावगतीच्या बाबतीत पाकिस्तान त्यांच्या पुढे आहे. याचा अर्थ, हशमतुल्लाह शाहिदीच्या नेतृत्वाखालील या संघाला मोठा धावडोंगर उभारावा लागेल. कर्णधार शाहिदी (२२६) आणि अजमतुल्लाह उमरजई (२०३) हे मधल्या फळीत योगदान देत असून, रहमानुल्लाह गुरबाज (२२४), रहमत शाह (२१२), इब्राहिम झादरान (२१२) आणि इकराम अलीखिल (२ सामन्यांत ७७ धावा) हे जबाबदारीने खेळत आहेत.
इकानाची खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असून, राशिद खान आणि मुजीब उल रहमान यांचा मारा भेदक ठरू शकतो. नेदरलँड्सची भिस्त कर्णधार स्कॉट एडवर्ड्स, साइब्रांड एंगेलब्रेक्ट, कॉलिन एकरमन आणि लोगान वान बीक यांच्यावर आहे.
Web Title: World Cup 2023 Afghanistan against Netherlands A must-win for the semi-final race
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.