भारतीय क्रिकेट संघाची १० वर्षांपासूनची आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त करण्याची प्रतीक्षा संपुष्टात आणण्यासाठी बीसीसीआयनं गांभीर्यानं विचार करण्यास सुरुवात केली आहे. एकापाठोपाठ एक अनेक विश्वचषक (ODI आणि T20) गमावल्यामुळे भारतीय क्रिकेट संघ आणि बीसीसीआयवर सातत्याने टीका होत आहे. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट बोर्डाने यंदा वर्ल्डकप जिंकण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. यात खेळाडूंचा 'कोअर ग्रूप' नेमण्यात येणार आहे. ज्यासाठी २० खेळाडूंची यादी शॉर्टलिस्ट करण्यात आली आहे.
वर्ल्डकप कसा जिंकायचा? रोहित-राहुलच्या उपस्थितीत BCCI ची महत्वाची बैठक, ३ निर्णयांवर शिक्कामोर्तब!
रविवार १ जानेवारी रोजी म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतीय बोर्डाने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आणि मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. मुंबईत झालेल्या या बैठकीत क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) आणि सचिव जय शाह उपस्थित होते. या बैठकीत टीम इंडियाची २०२२ मधील कामगिरी विशेषत: टी-२० कर्ल्डकपमधील अपयश आणि २०२३ वर्ल्डकपच्या रणनितीवर चर्चा करण्यात आली.
२० खेळाडू खेळणार सर्व सामने
या बैठकीत बीसीसीआयने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, ज्यामध्ये टीम इंडियातील नवीन खेळाडूंची निवड, त्यांचा फिटनेस आणि वर्कलोड मॅनेजमेंटवर लक्ष केंद्रित करण्यासंदर्भात चर्चा झाली. यासोबतच वनडे वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून बोर्डाने खेळाडूंचा कोअर ग्रुपही तयार केला आहे. बैठकीनंतर बोर्डाचे सचिव जय शहा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत माहिती दिली आणि ते म्हणाले, "बीसीसीआयने २० खेळाडूंची निवड केली आहे, ज्यांना विश्वचषकापर्यंत खेळवले जाईल"
यादीत कोणत्या खेळाडूंची निवड?
जय शहा यांनी यावेळी खेळाडूंची नावं उघड केली नाहीत. पण यात प्रामुख्यानं तेच खेळाडू आहेत जे गेल्या काही काळापासून एकदिवसीय संघाचा भाग आहेत. कर्णधार रोहित व्यतिरिक्त, विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, केएल राहुल यांची नावं त्यात निश्चितपणे असतील. याशिवाय इशान किशन, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव यांचाही या यादीत समावेश असण्याची दाट शक्यता आहे.
रिषभ पंतला संधी मिळणार का?
या यादीत ऋषभ पंतचा समावेश होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतचा शुक्रवारी ३० डिसेंबरला रुडकीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने त्याचे प्राण वाचले, मात्र शरीरावर अनेक जखमा झाल्या आहेत, त्यामुळे तो बराच वेळ मैदानावर परतू शकणार नाही. अशा परिस्थितीत पंतला या २० खेळाडूंमध्ये स्थान मिळते की नाही हे पहावं लागणार आहे.
Web Title: world cup 2023 bcci shortlist 20 players core group team india review meeting
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.