Join us  

IND vs BAN: रोहित शर्माला बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात 'या' खास हॅटट्रिकची संधी

भारत-बांगलादेश यांच्यात आज पुण्यात रंगणार सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 12:36 PM

Open in App

Rohit Sharma, IND vs BAN Live : भारतात सुरू असलेला वन डे विश्वचषक सध्या अनोख्या वळणावर आहे. सर्वाधिक जगज्जेतेपद मिळवलेल्या ऑस्ट्रेलियाला शेवटल्या ५ संघांमध्ये स्थान मिळालं आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला आहे. तर नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली आहे. याच दरम्यान आज भारत-बांगलादेश यांच्यात सामना रंगणार आहे. विश्वचषकाच्या इतिहासात भारत विरुद्ध बांगलादेश सामना एकूण चार वेळा खेळला गेला. यापैकी टीम इंडियाने तीन वेळा तर बांगलादेशने एकदा विजय मिळवला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आजच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला एक अनोखी हॅटट्रिक करण्याची संधी आहे.

कर्णधार रोहित शर्माला आज एक खास विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे. रोहित शर्माने 2015 आणि 2019 च्या विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध शतके झळकावली होती. पुण्यात होणाऱ्या सामन्यात रोहितने पुन्हा एकदा अशी कामगिरी केली तर विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध शतकांची हॅट्ट्रिक त्याच्या नावावर होईल. 2015 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळला गेला होता, जो भारताने 109 धावांनी जिंकला होता. त्या सामन्यात रोहित शर्माने १३७ धावा केल्या होत्या. 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि बांगलादेश साखळी फेरीत आमनेसामने होते आणि त्यानंतर रोहित शर्माने 104 धावांची तुफानी खेळी केली.

बांगलादेश विरूद्धचा एकमेव पराभव जिव्हारी लागणारा...

भारताने 2011, 2015 आणि 2019 च्या विश्वचषकात बांगलादेशला पराभूत केले. विश्वचषकात बांगलादेश विरुद्ध एकच पराभव झाला. 2007 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात एकदिवसीय विश्वचषकातील पहिला सामना खेळला गेला आणि राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला पाच विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, द्रविड, युवराज सिंग, एमएस धोनी, हरभजन सिंग आणि झहीर खान यासारखे दिग्गज त्या सामन्याचा भाग होते. या सामन्याचा विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठ्या अपसेटमध्ये समावेश आहे. या पराभवामुळे टीम इंडिया 2007 च्या वर्ल्ड कपच्या प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नाही. यानंतर टीम इंडियाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपरोहित शर्माभारत विरुद्ध बांगलादेशबांगलादेश