Join us  

भारत विजयी लय कायम राखणार? इंग्लंडला लोळविण्याची तयारी, विराटच्या शतकाचीही प्रतीक्षा

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर सामना खेळणाऱ्या रोहित शर्माच्या संघापुढेही लय कायम राखण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 9:48 AM

Open in App

लखनौ : वनडे विश्वचषक सुरू होण्याआधी इंग्लंडला पुन्हा एकदा संभाव्य जेतेपदाच्या शर्यतीत उतरविण्यात आले होते. हा संघ उपांत्य फेरी तर चुटकीसरशी गाठू शकतो, असा दावाही करण्यात आला; पण झाले उलटेच. यजमान भारत पाच विजयांसह पुढे आला. इंग्लंड मात्र अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे. दोन्ही संघ इकानाच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर रविवारी आमनेसामने येणार आहेत. तेव्हा आठवडाभराच्या विश्रांतीनंतर सामना खेळणाऱ्या रोहित शर्माच्या संघापुढेही लय कायम राखण्याचे आव्हान असेल.

रोहितने आतापर्यंत दमदार सलामी दिली आहे. पांड्याच्या अनुपस्थितीत  सूर्याला संधी देण्याचाही विचार होऊ शकतो. विराटकडून विक्रमी ४९ वी शतकी खेळी चाहत्यांना अपेक्षित आहे.

रोहित १००व्या सामन्यात १८ हजार धावांचा टप्पा गाठणार!

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात कर्णधार म्हणून रोहित शर्मा १०० वा सामना खेळणार आहे. टीम इंडिया आपल्या लाडक्या कर्णधाराला सलग सहाव्या विजयाची भेट देण्यासाठी उत्सुक आहे. तर रोहितदेखील एक माइलस्टोन पार करण्याच्या तयारीत असेल. रोहित इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात आपल्या १८ हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करू शकतो.

‘त्या’ घटनेची आठवण काढू नका : राहुल

इकाना स्टेडियमवरील आयपीएलचा तो सामना लोकेश राहुल विसरू शकणार नाही. लखनौ सुपर किंग्सचा हा कर्णधार याच मैदानावर क्षेत्ररक्षणादरम्यान कोसळला होता. तो दुखापतग्रस्त झाला. विदेशात त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे अनेक महिने क्रिकेटला मुकावे लागले होते. इंग्लंडविरुद्ध रविवारी या मैदानावर यष्टिरक्षक- फलंदाज राहुल खेळणार आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला खेळपट्टी पाहिल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी त्या घटनेचा उल्लेख करताच राहुलचे उत्तर होते, ‘मी ती घटना विसरू इच्छितो. मला तुम्ही आठवणही करून देऊ नका!’

दिग्गज लावणार हजेरी

या सामन्यासाठी स्टेडियममध्ये  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उपस्थित राहतील. याशिवाय गुगलचे सीईओ सुंदर पिचई हेदेखील येण्याची शक्यता आहे.  इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सामन्याच्या निमित्ताने लखनौला भेट देतील आणि सामना पाहतील असे सांगितले जात होते, मात्र ही अफवा असल्याची माहिती यूपीसीएने दिली.

पिच रिपोर्ट...

इकानाची खेळपट्टी मंद असून ती फिरकीपटूंना अधिक साथ देते. येथे एकूण १२ वनडे खेळले गेले. प्रथम फलंदाजी करणारा संघ तीन वेळा तर लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ ९ वेळा जिंकला.

वेदर रिपोर्ट...

रविवारी दुपारचे तापमान ३१ अंश सेल्सियस असेल. सायंकाळी २५ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता ५ टक्के वर्तविण्यात येत आहे.

अश्विन खेळण्याची शक्यता

भारताला हार्दिकची उणीव जाणवेल. त्यामुळे फिरकीला पूरक मानल्या जाणाऱ्या या खेळपट्टीवर शार्दूल ठाकूरच्या जागी रविचंद्रन अश्विनला संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे.  पाच गोलंदाज खेळविण्यावर संघ व्यवस्थापन भर देत आहे.  बुमराह, कुलदीप आणि जडेजा यांची जागा पक्की असून, अश्विनला संधी दिल्यास मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्यापैकी एकाला बाहेर बसावे लागेल. कानपूरचा चायनामॅन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याला इकानाच्या खेळपट्टीचा चांगला अभ्यास आहे. त्याचे चेंडू इंग्लिश फलंदाज कसे खेळतील, यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

तिकिटे संपल्याने अनेकांची निराशा

वारंवार प्रयत्न करूनदेखील तिकीट न मिळाल्याने अनेक जण निराश आहेत. ज्यांच्याकडे तिकीट उपलब्ध आहे ते १५०० चे तिकीट १० हजारात विकण्यास तयार आहेत. खेळाडूंच्या ड्रेसिंग रूमजवळचे तिकीट तर ८५ हजारांचे आहे. अधिकृत विक्री काउंटरपुढे मात्र ‘सोल्ड आउट’चे फलक लागले आहेत. अशीच एकाकडे विचारणा केली. तो म्हणाला, ‘१५०० चे तिकीट १० हजारात! तीन घेणार असाल तर २५ हजार लागतील.’

आमने सामने

  • एकूण १०६
  • भारत विजयी : ५७
  • इंलंड विजयी : ४४
  • निकाल नाही : ०३

वनडे विश्वचषकात...

  • एकूण ०८
  • भारत विजयी : ०३
  • इंग्लंड विजयी : ०४
  • अनिर्णीत : ०१

भारतातील विश्वचषकात...

  • भारत विजयी : ००
  • इंग्लंड विजयी : ०१
  • निकाल नाही : ०१ 
टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध इंग्लंड