मुंबई : पूर्णपणे एकतर्फी झालेल्या सामन्यात भारताने आशिया चषक अंतिम सामन्याची पुनरावृत्तीच घडवून आणली. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारताने ५० षटकांत ८ बाद ३५७ धावांचा डोंगर उभारला. यानंतर श्रीलंकेचा डाव १९.४ षटकांत केवळ ५५ धावांत गुंडाळत ३०२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासह भारत विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघही ठरला.
भारताने धावांच्या बाबतीत विश्वचषक स्पर्धेतील आपला सर्वोत्तम विजयही नोंदवला. सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया चषक अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला ५० धावांत गुंडाळले होते. मोहम्मद शमीने ५, मोहम्मद सिराजने ३, तर जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेत लंकेचा खेळ खल्लास केला. अर्धा संघ केवळ १४ धावांत गारद करत भारताने लंकेची हवाच काढली होती. शमीने विश्वचषक स्पर्धा इतिहासात तिसऱ्यांदा अर्धा संघ बाद करण्याचा पराक्रम केला. लंकेकडून केवळ अँजेलो मॅथ्यूज, महीश तीक्ष्णा आणि कसून रजिथा यांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली.
त्याआधी, शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या तीन प्रमुख फलंदाजांचे शतक हुकल्यानंतरही भारताने भक्कम धावसंख्या उभारली. विश्वचषक स्पर्धेत भारताने वैयक्तिक शतकाविना सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम नोंदवला. पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर दिलशान मदुशंकाने कर्णधार रोहित शर्माला त्रिफळाचीत केले. त्याने भारताचा अर्धा संघ बाद केला खरा; मात्र यासाठी त्याला धावांची खैरातही करावी लागली. यानंतर लंकेने शुभमन गिल आणि विराट कोहली यांना जीवदान देत मोठी चूकही केली. यावेळी गिल ८, तर कोहली केवळ १० धावांवर खेळत होता.
आणि शमीने डोक्यावरून चेंडू फिरवला
शमीने तीन सामन्यांत दुसऱ्यांदा पाच बळी पूर्ण करताच डोक्यावरून चेंडू फिरवला आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाब्रे यांच्याकडे इशारा केला. सामनावीर ठरल्यानंतर शमी म्हणाला, याचे श्रेय संघ व्यवस्थापनाला जाते. गोलंदाजांना तयार करण्यासाठी जो घाम गाळला जातो त्याचेच हे फळ आहे.
सामनावीर शमीची डरकाळी
- विश्वचषकात मोहम्मद शमीने सर्वाधिक तीनवेळा अर्धा संघ बाद करण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली.
- विश्वचषकात मोहम्मद शमी सर्वाधिक बळी (४५) घेणारा भारतीय गोलंदाज ठरला. त्याने झहीर खान व जवागल श्रीनाथ (दोघेही ४४ बळी) यांना मागे टाकले.
सामन्यातील ठळक वैशिष्ट्ये-
- विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक ११८ वेळा ५० हून अधिक धावांची खेळी करत श्रीलंकेच्या कुमार संगकारासह संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले. सचिन तेंडुलकर (१४५) अव्वलस्थानी कायम.
- एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात १३ व्यांदा ५० हून अधिक धावांची खेळी करत विराट कोहलीने कुमार संगकारा, शाकिब अल हसन आणि रोहित शर्मा (प्रत्येकी १२) यांना मागे टाकत दुसरे स्थान पटकावले. सचिन तेंडुलकर (२१) अव्वलस्थानी कायम.
- एका कॅलेंडर वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी आठव्यांदा एक हजाराहून अधिक धावा काढताना विराट कोहलीने सचिनचा (७) विश्वविक्रम मोडला.
- श्रीलंकेविरुद्ध ४ हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा सचिन तेंडुलकरनंतरचा केवळ दुसरा आणि आशिया खंडात ८ हजार वनडे धावांचा टप्पा पार करणारा चौथा फलंदाज ठरला.
- विश्वचषकात पहिल्या दहा षटकांत श्रीलंकेने तिसरी (६ बाद १४) नीचांकी धावसंख्या नोंदवली.
- श्रेयस अय्यरने ४९ व्या एकदिवसीय डावांत २ हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो तिसरा वेगवान भारतीय ठरला.
- विश्वचषक सामन्यात सहा किंवा त्याहून अधिक षट्कार मारणारा श्रेयस अय्यर हा पाचवा भारतीय फलंदाज ठरला.
- विश्वचषक सामन्यात डावातील पहिल्याच चेंडूवर बळी घेणारा जसप्रीत बुमराह हा पहिला भारतीय ठरला.
Web Title: World Cup 2023: India into semis with resounding win; Mohammad Shami picked half the team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.