अफगाणिस्तानवर भारताचा शानदार विजय झाल्यानंतर आता १४ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची चर्चा रंगली आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे. हे लक्षात घेऊन भारतीय रेल्वेनेही क्रिकेट चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. दरम्यान, शनिवारी होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय रेल्वेने मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान दोन विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे.
आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येणार आहेत. भारतीय रेल्वेने मुंबईत राहणाऱ्या लोकांसाठी खास व्यवस्था केली आहे. या खास दिवसासाठी भारतीय रेल्वे मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद जादा गाड्या चालवणार आहे. जेणेकरून लोक सामना पाहण्यासाठी अहमदाबादला सहज पोहोचू शकतील.
काय असेल ट्रेनचे टायमिंग?हा सामना शनिवारी दुपारी २ वाजता सुरू होईल. अशा परिस्थितीत मुंबई सेंट्रल-अहमदाबाद विशेष ट्रेन मिलेनियम सिटी येथून उद्या म्हणजेच १३ ऑक्टोबर रोजी निघेल आणि शनिवारी पहाटे ५.३० वाजता आपल्या गंतव्यस्थानी पोहोचेल. दरम्यान, अहमदाबाद-मुंबई सेंट्रल स्पेशल ट्रेन अहमदाबादहून रविवारी (१५ ऑक्टोबर) पहाटे ४ वाजता सुटेल आणि दुपारी १२.१० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल.
ट्रेनसाठी 'विशेष भाडे' आकारले जाईलया ट्रेनसाठी 'विशेष भाडे' आकारले जाईल, असे रेल्वेकडून जारी करण्यात आले आहे. रेल्वेच्या मते, भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी या ट्रेन क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी भेट असेल. या विशेष ट्रेनमध्ये एसी 2-टायर, एसी 3-टायर, स्लीपर क्लास आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे समाविष्ट आहेत आणि त्या दादर, बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, नवसारी, सुरत आणि बडोदा स्थानकावर थांबतील.