वर्ल्ड कप २०२३ सुरू होण्यास फारच कमी वेळ शिल्लक आहे. वर्ल्ड कपसाठी अनेक संघ जाहीर झाले आहेत. यातच आता न्यूझीलंड क्रिकेट संघाने वर्ल्ड कपसाठी खेळाडूंची घोषणा केली आहे. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने संघ जाहीर केला आहे. यामध्ये ट्रेंट बोल्ट, मार्क चॅम्पमन आणि टॉम लॅथमसह १५ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंडमध्ये असून एकदिवसीय मालिका खेळत आहे.
न्यूझीलंडने वर्ल्ड कपसाठी अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंचाही संघात समावेश केला आहे. संघाने वेगवान गोलंदाज बोल्टचा वर्ल्ड कपसाठी संघात समावेश केला आहे. बोल्टने अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली आहे. एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने ७ षटकात १७ धावा देत ३ बळी घेतले. मात्र, न्यूझीलंड संघाला हा सामना जिंकता आला नाही.
याचबरोबर, वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंड संघाने डेव्हॉन कॉनवेला संधी दिली आहे. कॉनवेने न्यूझीलंडकडून २० एकदिवसीय सामने खेळले असून यादरम्यान त्याने ८५८ धावा केल्या आहेत. तसेच, या कालावधीत त्याने ४ शतके आणि ३ अर्धशतके केली आहेत. त्याने सर्वोत्तम एकदिवसीय सामन्यात १३८ धावा केल्या आहेत. तसेच, चॅपमनने १२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २ शतके झळकावली आहेत.
लॅथमबद्दल बोलायचे झाले तर अनुभवी खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश आहे. त्याने १३२ सामन्यात ३७८१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ७ शतके आणि २१ अर्धशतके केली आहेत. याशिवाय, न्यूझीलंडने जिमी नीशम, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री आणि ग्लेन फिलिप्स यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. फर्ग्युसनने संघासाठी ५४ एकदिवसीय सामन्यात ८६ विकेट घेतल्या आहेत. तर ४५ धावांत ५ विकेट घेणे ही त्याची एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे.
वर्ल्ड कप २०२३ साठी न्यूझीलंडचा संघ : केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेनरी, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सेंटनर, ईश सोधी, टिम साउथी आणि विल यंग.
खेळाडूंच्या कुटुंबीयांनी केली घोषणा!न्यूझीलंडने वर्ल्ड कपसाठी अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंचाही संघात समावेश केला आहे. त्यामुळे संघात निवड झालेल्या खेळाडूंच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.