वर्ल्ड कप विशेष लेख: ग्लेन मॅक्सवेल, तू नक्की कोणत्या तालमीत घडलास?

मंगळवारी रात्री वानखेडेवर मॅक्सवेलचा जो झंझावात दिसला तो चमत्काराहून कमी नव्हता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 11:12 AM2023-11-09T11:12:24+5:302023-11-09T11:13:55+5:30

whatsapp join usJoin us
World Cup 2023 Special Article on Glenn Maxwell match Winning Innings against Afghanistan to win Australia into Semi Finals | वर्ल्ड कप विशेष लेख: ग्लेन मॅक्सवेल, तू नक्की कोणत्या तालमीत घडलास?

वर्ल्ड कप विशेष लेख: ग्लेन मॅक्सवेल, तू नक्की कोणत्या तालमीत घडलास?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मतीन खान, स्पोर्ट्‌स हेड - सहायक उपाध्यक्ष, लोकमत पत्रसमूह

मंगळवारी रात्री वानखेडेवर जो झंझावात दिसला तो चमत्काराहून कमी नव्हता. पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला ग्लेन मॅक्सवेलने एकट्याच्या बळावर विजयी केले. अफगाणी पठाण केवळ चेंडूचा पाठलाग करीत राहिले. मॅक्सवेलचे फटके पाहून मी हाच विचार करीत राहिलो की... ‘मॅक्सवेल तू कुठल्या तालमीतून घडलेला खेळाडू आहेस?’ ९१ धावांत ७ फलंदाज गमावलेले. पायात गोळे-पेटके आल्याने जर्जर झालेल्या मॅक्सवेलने नाबाद द्विशतकी खेळी करीत ऑस्ट्रेलियाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. त्याने २१ चौकार आणि १० षटकारांची लयलूट केली.

मॅक्सवेलला धावता काय, चालताही येत नव्हते;  पण, त्याही स्थितीत तो तुफान खेळला. त्याची बॅट ज्या चेंडूला लागत होती तो चौकार किंवा षटकारच जात होता. ज्या माणसाला पायही हलवता येत नाही तो फक्त कुटत गेला. मॅक्सवेलसारख्या खेळाडूंमध्ये ही हिंमत कशी संचारते, याचे विश्लेषण करू या...

आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे खेळाडू उच्च दर्जाच्या कौशल्य आणि गुणवत्तेचे धनी मानले जातात. मॅक्सवेलसारख्या खेळाडूंमध्ये अद्भुत अशी मानसिक शक्ती आहे. त्याची देहबोली प्रतिस्पर्ध्यांचे नामोहरम करण्यास पुरेशी ठरते.स्वत:चे डावपेच कृतीत उतरविण्याचे अलौकिक कौशल्य आहेच, आव्हानात्मक स्थितीत  तो अधिकच कणखरही बनतो. मॅक्सवेल आपल्या बॅटरूपी तलवारीतून अशक्यप्राय वाटणारे फटके मारतो. कोणालाही सहजपणे विश्वास बसणार नाही असे ते फटके असतात. ऑनसाईडला मारलेला फटका ऑफसाईडला षटकार जाऊ शकतो. रिव्हर्स स्कूप, रिव्हर्स स्विच काय वाट्टेल ते करतो. कधी बॅट दांडपट्ट्यासारखी चालवतो कधी बेसबॉलसारखी. विव्ह  रिचर्ड्स, कपिलदेव, महेंद्रसिंग धोनी, रिकी पाँटिंग  आणि अलीकडे विराट कोहली यांनी अशीच मानसिकता दाखवली होती.

  • मॅक्सवेलने अमानवी वाटणाऱ्या खेळाचा प्रत्यय घडविला. पायात वेदना असताना चेहऱ्यावर हास्य होते. एक महान लक्ष्य गाठायचे असेल तर वेदना विसराव्या लागतील, याची त्याला जाणीव होती.
  • मॅक्सवेलला धावणे तर सोडा, चालणे कठीण झाले होते; पण, आपल्या उणिवा न सांगता त्याने विविधढंगी फटक्यांची मुक्त पोतडी उघडली.
  • अशक्यप्राय वाटणाऱ्या खेळीत  मॅक्सवेलला दोनदा जीवनदान मिळाले. दोनदा रिव्ह्यूने वाचवले. पण, म्हणतात ना, धाडसी माणसांना नशीब साथ देते.. प्रचंड उकाड्यात ५० षटके क्षेत्ररक्षण, त्यातही १० षटके गोलंदाजी केल्यावर मॅक्सवेलने ही खेळी साकारली.
  • अफगाणच्या गोलंदाजांना त्याने खुजे ठरविले. त्यांची प्रत्येक चाल जणूकाही त्याला आधीच माहीत असावी, असे चित्र होते. नबी बचावात्मक मारा करेल, हे लक्षात घेत त्याने बॅकफूटवर खेळून त्याला दोन षटकांत २० धावांचा प्रसाद दिला. असा हा मॅक्सवेल आपल्या सहकाऱ्यांना म्हणत असावा...   ‘दुआ करो की सलामत रहे हिम्मत मेरी, यह एक चिराग कई आँधियों पे भारी है!’

Web Title: World Cup 2023 Special Article on Glenn Maxwell match Winning Innings against Afghanistan to win Australia into Semi Finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.