मुंबई : भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या १२ नोव्हेंबर रोजी वनडे विश्वचषकातील नेदरलँड्सविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात बंगळुरू येथे खेळू शकतो. त्याआधी त्याच्या खेळण्याची शक्यता कमीच वाटते. १९ ऑक्टोबर रोजी पुण्यात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान आपल्याच गोलंदाजीवर पायाने चेंडू अडविताना त्याला घोट्याची दुखापत झाली होती.
‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिकची दुखापत सुधारत असून, तो अखेरचा साखळी सामना खेळू शकतो. काही कारणास्तव हा सामना खेळला नाही तर तो थेट उपांत्य सामन्यात खेळताना दिसेल. पांड्याची पोकळी भरून काढण्यासाठी सूर्याला संधी देण्यात आली असून, पाच गोलंदाज मैदानात दिसतात. शमीच्या शानदार फॉर्ममुळे हार्दिकची उणीव मुळीच जाणवली नाही. मात्र, संघात संतुलनासाठी त्याची उपस्थिती अनिवार्य ठरते. हार्दिक सध्या ‘एनसीए’त उपचार घेत आहे.