Cricket World Cup 2023: राजधानी दिल्लीत जी-20 परिषद होणार आहे. याच्या निमंत्रण पत्रिकेवरुन नवीन वाद सुरू झाला आहे. या पत्रिकेवर देशाचा उल्लेख इंडियाऐवजी भारत केला आहे. त्यामुळे आता आपल्या देशाचे नाव 'इंडिया'ऐवजी 'भारत' करण्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेदरम्यान, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) मोठी मागणी केली आहे.
विश्वचषकात भारतीय संघाच्या जर्सीवर 'इंडिया' ऐवजी 'भारत' लिहावे, अशी मागणी सेहवागने केली आहे. सेहवागने लिहिले की, 'माझा नेहमीच विश्वास आहे की, नाव असे असावे, त्यामुळे आपल्याला अभिमान वाटेल. आम्ही भारतीय आहोत. इंडिया नाव इंग्रजांनी दिले होते, आपले मूळ नाव 'भारत' परत मिळण्यास बराच काळ लागला आहे. मी बीसीसीआय आणि जय शहा यांना विनंती कतो की, विश्वचषकात भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर 'इंडिया' ऐवजी 'भारत' लिहावे.
आज बीसीसीआयने विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली. बीसीसीआयच्या ट्विटला रिपोस्ट करत सेहवाग म्हणाला की, आता टीम इंडिया नाही, टीम भारत. विश्वचषकात आपण कोहली, रोहित, बुमराह, जड्डूचा जयजयकार करतो. जसा आपल्या हृदयात भारत आहे, तसाच आपल्या खेळाडूंच्या जर्सीवरही यावा. या ट्विटमध्येही सेगवागने जय शहांना टॅग केले आहे.
आणखी एका ट्विटमध्ये सेहवाग म्हणतो, 1996 चा विश्वचषक खेळण्यासाठी नेदरलँडची टीम भारतात आली होती, तेव्हा त्यांचे नाव होलंड होते. पण 2003 मध्ये त्यांनी नेदरलँड नावाने खेळले. ब्रिटीशांनी म्यानमारला दिलेले बर्मा नावही त्यांनी बदलले आहे. इतर अनेक देश त्यांच्या मूळ नावावर परतत आहेत.
विश्वचषक कधीपासून आहे?
एकदिवसीय विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सलामीचा सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. गेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. यावेळी विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे खेळणार आहे.
Web Title: world-cup-2023-virender-sehwag-demand-bharat-name-on-team-india-players-jersey
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.