नवी दिल्ली - भारतात ५ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या वन डे क्रिकेट विश्वचषकाच्या तिकीट विक्रीला १ जुलै रोजी सुरुवात होत आहे. १०० ते ५० हजार यादरम्यान सामने तसेच आयोजन स्थळे यावर आधारित तिकीट दर असतील. १० संघांचा समावेश असलेल्या या विश्वचषकात एकूण ४८ सामने खेळले जातील.
भारतीय संघ ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. ‘क्रिकेट वर्ल्ड कप डॉट कॉम’ या आयसीसीच्या अधिकृत वेबसाइटवर तिकिटे ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध असतील. मंगळवारी वेळापत्रक जाहीर झाल्यापासून जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी तिकिटांबाबत विचारणा केली आहे. आयसीसीच्या वेबसाइटशिवाय अधिकृत भागधारकही आपल्या प्लॅटफॉर्मवरून तिकीट विक्री करू शकतील.
पाकिस्तान न खेळल्यास प्लॅन ‘बी’ तयार!
विश्वचषकात पाकिस्तानच्या सहभागाबाबत अनिश्चितता कायम आहे. वेळापत्रक जाहीर झाले; पण पाकिस्तान खेळला नाही तर आयसीसीकडे प्लॅन बी तयार आहे. पाकिस्तान सरकारने भारतात खेळण्यासाठी अद्याप संघाला परवानगी दिलेली नाही. पाकिस्तानने भाग घेतला नाही तर त्यांच्या जागी क्वालिफायरमधील तिसऱ्या क्रमांकाचा संघ खेळेल. ग्रुप स्टेजमधील दोन सामने गमावल्यामुळे वेस्ट इंडीजवर वर्ल्डकपसाठी पात्रता न मिळण्याचा धोका आहे. श्रीलंका, झिम्बाब्वे, स्कॉटलंड, नेदरलँड आणि ओमान हे संघ सुपर सिक्ससाठी पात्र ठरले आहेत.
Web Title: World Cup 2023: World Cup ticket sales from July 1
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.