नवी दिल्ली : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा निराशेच्या गर्तेत गेला. पराभवाच्या निराशेतून स्वत:ला कसे सावरायचे हे त्याला ठाऊक नव्हते; पण चाहत्यांच्या प्रेमामुळे तो पुन्हा शिखरावर पोहोचण्यास सज्ज झाला आहे. रोहित शर्मानेच स्वत: याबाबत सांगितले. कोणत्या शिखरावर पोहोचायचंय हे रोहितने सांगितले नसले तरी, तो पुढील वर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्याबाबत विचार करीत आहे, असे सांगितले जात आहे.
विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवानंतर पहिल्यांदाच रोहितने आपल्या भावना व्यक्त केल्या. अंतिम लढतीनंतर मैदानातून बाहेर पडताना रोहितला अश्रू अनावर झाले होते. रोहितने सोशल मीडियाद्वारे सांगितले की, ‘सुरुवातीला या निराशेतून कसे सावरायचे हेच मला कळत नव्हते. माझे कुटुंबीय आणि मित्रांनी मला प्रेरित केले. पराभव पचवणे सोपे नव्हते; पण जीवन पुढे जात राहते. आयुष्यात पुढे जाणे माझ्यासाठी सोपे नव्हते.’
रोहितने संघाच्या विश्वचषकातील शानदार कामगिरीचे कौतुक केले. तो म्हणाला की, ‘लोक माझ्याकडे येऊन संघाचा अभिमान वाटत असल्याचे सांगत होते. मला खूप चांगले वाटत होते. त्यांच्यासोबत मीही दु:खातून बाहेर पडत गेलो. खेळाडू कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, हे समजून जेव्हा लोक आपली निराशा व्यक्त करीत नाही, तेव्हा ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण लोकांमध्ये आमच्याबद्दल राग नव्हता. जेव्हा-जेव्हा चाहते भेटले तेव्हा त्यांनी आमच्यावर प्रेमच केले आहे.’
विश्वचषक पाहत मोठा झालो; पण...
‘एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक स्पर्धेबाबत लहानपणापासूनच माझ्या मनात उत्सुकता होती. विश्वचषक हीच माझ्यासाठी सर्वांत मोठी भेट होती. विश्वचषक जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतली होती; पण विश्वचषक गमावल्याचे दु:ख होणारच. विश्वचषक उंचाविण्याचे स्वप्नच दुरावल्याचे दु:ख कायम राहील. - रोहित शर्मा