ICC ODI World Cup England vs New Zealand Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून सुरूवात झाली. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अशी ओळख असलेल्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात सलामीचा सामना सुरू झाला. पण, प्रेक्षकांनी या लढतीकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसले. या सामन्यात गत उपविजेत्या न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पहिल्या इंनिंग्जमध्ये वर्चस्व गाजवलेले पाहायला मिळाले. जो रूट आणि जोस बटलर वगळल्यास इंग्लंडच्या अन्य फलंदाजांनी पहिल्याच सामन्यात निराश केले.
सचिन तेंडुलकरने सांगितला २०११च्या वर्ल्ड कपमधील २१ बॅटींचा किस्सा! नसेल माहित तर नक्की वाचा...
न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने इंग्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. जॉनी बेअरस्टोने षटकाराने इंग्लंडच्या डावाची सुरुवात करून दिली आणि डेव्हिड मलाननेही चांगली साथ दिली. मॅट हेन्रीने ८व्या षटकात सलामीवीर मलानला ( १४) झेलबाद केले. त्यानंतर सँटनरने दुसरा धक्का देताना बेअरस्टोला ( ३३) बाद केले. हॅरी ब्रूकने रवींद्र राचिनच्या षटकात आक्रमण करताना ४,४,६ असे फटके मारले, परंतु आणखी एक षटकार खेचण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. ब्रूकने १६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह २५ धावा केल्या. ग्लेन फिलिप्सने त्याच्या पहिल्याच षटकात अलीचा ( ११) त्रिफळा उडवून इंग्लंडला चौथा धक्का दिला. ( ENG vs NZ Live Scorecard )
जो रूट आणि कर्णधार जोस बटलर यांनी इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रूटने ५७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि बटलरसोबत अर्धशतकीय भागीदारीही पूर्ण केली. ७१ चेंडूंवरील ७० धावांची ही भागीदारी मॅट हेन्रीने तोडली आणि बटलरला ४३ ( ४२ चेंडू) धावांवर माघारी जावे लागले. इंग्लंडचा निम्मा संघ ३३.२ षटकांत १८८ धावांवर तंबूत परतला. रूट एका बाजूने चांगला खेळ करत होता, परंतु समोरून त्याला साथ मिळताना दिसली नाही. लिएम लिव्हिंगस्टोन ( २०) ट्रेंट बोल्टच्या नकल बॉलवर झेलबाद झाला. रूटचा संघर्ष फिलिप्सने संपुष्टात आणला. रूट ८६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ७७ धावांवर त्रिफळाचीत झाला.