मुंबई, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : : क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील सर्वात महत्वाचा निर्णय ठरला होता तो 'ओव्हर थ्रो'वर इंग्लंडला बहाल करण्यात आलेल्या सहा धावा. या सहा धावांमुळे इंग्लंडचा संघ विजयासमीप पोहोचला होता. पण अंतिम फेरीतील हा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला होता. त्यामुळेच हा 'ओव्हर थ्रो'चा नियम बदलण्यात येणार असल्याचे बदलले जात आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निकाल न लागता केवळ चौकारांच्या आधारावर इंग्लंडला जेतेपद देण्यात आले. निर्धारित 50-50 षटकं आणि सुपर ओव्हर यांच्यातही सामना बरोबरीत सुटला होता. पण, सर्वाधिक चौकारांच्या जोरावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. क्रिकेट चाहत्यांना आयसीसीचा हा नियम काही पटलेला नाही. या व्यतिरिक्त अंतिम सामन्यात अंपायर कुमार धर्मसेना यांनी दिलेला एक निर्णयावरही टीका होत आहे आणि तो म्हणजे 'ओव्हर थ्रो'.
इंग्लंडला अखेरच्या तीन चेंडूंत 9 धावांची गरज होती. ट्रेंट बोल्टने टाकलेला फुलटॉस चेंडू बेन स्टोक्सनं डीप मिड विकेटच्या दिशेनं टोलावला. पण, मार्टिन गुप्तीलनं तो चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेनं फेकला आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्टोक्सच्या बॅटीला लागून चेंडू सीमारेषेबाहेर गेला. कुमार धर्मसेनानं सहकारी पंचांशी चर्चा करून इंग्लंडला सहा धावा देण्यात आल्या. त्यानंतर हे समीकरण 2 चेंडूंत 3 धावा असे झाले आणि इंग्लंडने सामना बरोबरीत सोडवला.
अंतिम सामन्यात झालेल्या जोरदार टीकेमुळे आता हा नियम बदलण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहे. आयसीसीने यापूर्वी दोन नियम बदलले आहेत. आता हा नियमही बदलला जाईल, असे म्हटले जात आहे. एमसीसीची एक बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये ओव्हर थ्रो'चा नियम बदलला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
नियम काय सांगतो?आयसीसीच्या नियम 19.8 नुसार इंग्लंडला देण्यात आलेल्या सहा धावा या चुकीच्या ठरतात. त्यांना पाच धावा मिळायला हव्या होत्या. ओव्हर थ्रोमुळे किंवा क्षेत्ररक्षकाच्या चुकीच्या कृतीमुळे चेंडू सीमारेषेबाहेर गेल्यास धावून घेतलेल्या धावा आणि चार अशा मिळून धावा दिल्या जातात. पण, थ्रो होण्यापूर्वी फलंदाजांनी खेळपट्टीचा मध्यभाग तरी पार करायला हवा. या नियमामुळेच थोडासा संभ्रम निर्माण होत आहे. जेव्हा गुप्तीलने थ्रो केला त्यावेली स्टोक्स व आदिल रशीद यांनी खेळपट्टीचा मध्यभागही ओलांडलेला नव्हता. त्यावरून हे स्पष्ट दिसते की इंग्लंडला पाचच धावा मिळायला हव्या होत्या. तसे झाले असते तर न्यूझीलंडने एका धावेने जेतेपद पटकावले असते. मग सुपर ओव्हर घेण्याचीही गरज भासली नसती.
आयसीसीचं म्हणणं काय?''मैदानावर हजर असलेल्या अंपायर्सनी त्यांना नियमातून समजलेल्या व्याख्यानुसार तो निर्णय दिला. त्यामुळे आम्ही त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही,'' असे आयसीसीकडून सांगण्यात आले.