नवी दिल्ली - विराट कोहली मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप मजबूत क्रिकेटपटू आहे. भारतात होणाऱ्या यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत कोहलीचा दबदबा राहील. तसेच भारतासह पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंड स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करतील, असे वेस्ट इंडीजचा माजी दिग्गज फलंदाज ख्रिस गेल याने सांगितले. एकदिवसीय सामन्यांची विश्वचषक स्पर्धा ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरदरम्यान भारतात रंगेल.
एका कार्यक्रमादरम्यान गेलने सांगितले की, ‘गेल्या अनेक वर्षांपासून आयसीसी चषक न जिंकल्यामुळे भारतावर टीका होत आहे. पण, भारतच का? वेस्ट इंडीजनेही २०१६ सालानंतर आयसीसी जेतेपद पटकावलेले नाही. भारताकडे शानदार खेळाडू असून मायदेशात खेळण्याचा त्यांना फायदाही होईल. पण, त्याच वेळी भारतीय खेळाडूंवर दडपणही राहील; कारण भारतात सर्वांची इच्छा आहे की, मायदेशात टीम इंडियाच जिंकावी.’
विश्वचषकातील अव्वल चार संघांबाबत गेल म्हणाला की, ‘उपांत्य फेरी कोण गाठणार हे सांगणे कठीण आहे. पण, माझ्या मते भारत, पाक, इंग्लंड आणि न्यूझीलंड अव्वल चारमध्ये पोहोचतील असे वाटते.’ भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीबाबत गेलने सांगितले की, ‘प्रत्येक खेळाडू कारकिर्दीत खराब फॉर्ममधून जातो. कठीण काळ फारवेळ टिकत नाही. पण, मानसिकरीत्या आणि शारीरिकरीत्या मजबूत असलेले खेळाडू दीर्घवेळ टिकतात आणि कोहली असाच खेळाडू आहे. आयपीएलद्वारे कोहलीने आपला फॉर्म मिळवला असून हाच फॉर्म तो यंदाच्या विश्वचषकातही कायम राखेल.
विंडीजची स्थिती निराशाजनकविश्वचषक पात्रता फेरीत वेस्ट इंडीजचे स्थान काहीसे धोक्यात आले आहे. याबाबत गेलने म्हटले की, ‘संघाला या स्थितीत पाहून खूप दु:ख होते. संघाची वाटचाल कठीण झाली असून भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्रता मिळवली नाही, तर खूप निराशा होईल. आशा आहे की भविष्यात विंडीज संघाची स्थिती सुधारेल.’